नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र

पंतप्रधान मोदींना पत्र,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून शहरातील पाच हजार शालेय विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवत देशातील पहिली क्वाॅलिटी सिटी म्हणून नाशिकची निवड केल्याबद्दल आभार मानले. स्वच्छता, शिक्षण आणि कौशल्य विकासाबाबत आपला संकल्पही विद्यार्थ्यांनी या पत्रातून व्यक्त केला.

संबधित बातम्या :

युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या वर्धापन दिनानिमित्त जगभरात टपाल दिन साजरा केला जातो. लोकांना टपाल सेवेबाबत जागरूक करणे, या सेवेचे बदलत्या काळातील महत्त्व अधोरेखित करणे या उद्देशाने टपालदिनी विविध उपक्रम राबवले जातात. दरवर्षीचा टपाल दिन एका विशिष्ट संकल्पनेनुसार साजरा केला जातो. यंदाचा टपाल दिन ‘विश्वासासाठी एकत्र : सुरक्षित आणि परस्परपूरक भविष्यासाठी सहकार्य’ या संकल्पनेवर आधारित होता. क्वाॅलिटी सिटी नाशिक अभियानही याच संकल्पनेला अनुकूल असल्याने त्याची माहिती टपाल दिनानिमित्त शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे व त्यांना या चळवळीत सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आखला होता.

नाशिकला पहिली क्वाॅलिटी म्हणून मानांकित करण्यासाठी निवडल्याबद्दल पंतप्रधान आणि क्वाॅलिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांचे आभार मानणे आणि या अभियानाच्या यशस्वीतेसाठीचा संकल्प व्यक्त करणे यासाठी विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड लिहिण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, डिजिटल शिस्त, टपालसेवेच्या वापराबाबत जागरूकता वाढीस लागणे, हाही त्यामागचा उद्देश्य होता.

असे लिहिले पत्र…

त्यानुसार विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराथी अशा भाषांमध्ये ही पोस्टकार्ड लिहिली. काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितेच्या, तर काहींनी चित्रांच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. या पत्रांमधून विद्यार्थ्यांनी ते आपल्या शहर आणि परिसरातील स्वच्छतेविषयी किती जागरूक आणि संवेदनशील आहेत, याचे दर्शन घडवले. ही सर्व पोस्टकार्ड एकत्र करून नाशिकचे पोस्टमास्तर डॉ. संदेश बैरागी आणि पोस्टाचे विपणन अधिकारी विठ्ठल पोटे यांच्या उपस्थितीत टपाल कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आले.

या शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग…

नाशिक महापालिकेच्या शाळा, मराठा विद्या प्रसारक समाजाची होरायझन स्कूल, अशोका स्कूल, इस्पॅलियर हेरिटेज आणि एक्सपिरिमेंटल स्कूल, स्वामी विवेकानंद सोसायटीच्या इंदिरानगर आणि मोरवाडी येथील शाळा, शेठ आर. पी. विद्यालय.

हेही वाचा :

The post नाशिक शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांना पत्र appeared first on पुढारी.