छावा क्रांतिवीर सेनेचा पुनश्च हरिओम?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘स्वराज्य’ संघटनेतील प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर करण गायकर पुन्हा एकदा छावा क्रांतिवीर सेना कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहेत. २८ किंवा २९ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन ते पुढील दिशा निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

स्वराज्य संघटनेत छावा क्रांतिवीर सेना विलीन करून गायकर यांनी नवीन वाटचाल सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांनी आपल्या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना स्वराज्यमध्ये सामावून घेतले होते. मात्र, वर्षभरातच त्यांनी स्वराज्यला जय महाराष्ट्र केला. त्यांच्यासह नाशिक, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, रायगडसह इतर जिल्ह्यांतील पदाधिकारीदेखील स्वराज्यमधून बाहेर पडल्याने, या सर्वांना सोबत घेऊन पुन्हा एकदा छावा क्रांतिवीर सेना कार्यान्वित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. येत्या २८, २९ ऑक्टोबरला नाशिकमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन त्यात ते पुढील दिशा ठरविणार आहेत. दरम्यान, संघटना ते राजकीय पक्ष असा प्रवास करू पाहणाऱ्या स्वराज्यमधून ऐन निवडणुकांच्या तोंडावरच पदाधिकाऱ्यांची एक मोठी फळी बाहेर पडल्याने संघटनेला त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. अशात स्वराज्यप्रमुख माजी खासदार युवराज संभाजीराजे यांच्यासमोर संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

लोकसभेचे आव्हान

स्वराज्यप्रमुख माजी खासदार संभाजीराजे नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत ते सातत्याने नाशिक दौरे करीत आहेत. गेला वाढदिवसही त्यांनी प्रथमच कोल्हापूर सोडून नाशिकमध्येच साजरा केला होता. काही दिवसांपूर्वी नाशिकमधील स्वराज्यच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वराज्यचा उमेदवार निवडून आणणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच पदाधिकाऱ्यांनी स्वराज्यला जय महाराष्ट्र केल्याने, संभाजीराजे यांच्यासमोर लोकसभेचे मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पुढील काळात समाजकारण करायचे की, राजकारण याचा फैसला समर्थकांच्या सल्ल्याने घेणार आहे. छावा क्रांतिवीर सेना ही समाजकारण करणारी संघटना असून, समर्थकांनी तसा कौल दिल्यास संघटना पुन्हा जोमाने कार्यान्वित करणार आहे. आता ‘स्वराज्य’चा विषय संपला असून, लवकरच पुढील भूमिका जाहीर करणार आहे.

– करण गायकर

हेही वाचा :

The post छावा क्रांतिवीर सेनेचा पुनश्च हरिओम? appeared first on पुढारी.