भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

भाऊसाहेब चौधरी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्हे तर, शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत गोडसे यांनाच मिळणार, असा दावा करत भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल, केंद्रात नव्हे तर, राज्यस्तरावरच या जागेचा फैसला होणार असल्याचेही चौधरी यांनी सांगितले.

माजी मंत्री बबन घोलप यांनी शनिवारी (दि.६) ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात प्रवेश केला. घोलप यांच्या पक्षप्रवेशात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या चौधरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी शिंदे गटालाच मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याच्या शक्यतेवर चौधरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चौधरी म्हणाले की, नाशिक पारंपारिकरीत्या शिवसेनेची जागा आहे. शिवसेनाच ती लढणार आहे. प्रत्येक पक्षाकडून जागेची मागणी होत असते. पक्षातील इच्छुकांच्या रेट्यापुढे ती मागणी करावी लागते. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून भुजबळ उमेदवारी मागत असतील. पण, हेमंत गोडसे यांनी सलग दोन निवडणुकांमध्ये समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांचा पराभव केला आहे. गत निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी भुजबळ यांच्या विरोधात प्रचार केला आहे. त्यामुळे आता उमेदवारी भुजबळांना मिळाल्यास आमचा कार्यकर्ता भुजबळांच्या प्रचाराला पुढे येईल, असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे नाशिकची जागा शिवसेनेलाच मिळायला हवी. कल्याण लोकसभा मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली तशी नाशिकमधून गोडसे यांचीही उमेदवारी एक-दोन दिवसांत जाहीर होईल. गतवेळीपेक्षा यंदा गोडसे यांचे मताधिक्य वाढलेले असेल, असा दावा चौधरी यांनी केला.

ठाकरे गटाचे १० ते १२ माजी नगरसेवक संपर्कात
घोलप यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करीत आहेत, असे नमूद करत येत्या आठ दिवसांत नाशिकमधून मोठ्या प्रमाणावर शिवसेनेत इनकमिंग सुरू होईल. ठाकरे गटाचे १० ते १२ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहे, असा दावाही चौधरी यांनी केला.

गोडसे म्हणतात, भुजबळांचे काम करू!
भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिंदे गटाचे कार्यकर्ते काम करणार नाहीत, असा दावा शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी एकीकडे केला असताना दुसरीकडे मात्र हेमंत गोडसे बॅकफूटवर आल्याचे चित्र आहे. नाशिकवर गोडसे यांचा दावा कायम असला तरी महायुतीचा धर्म पाळला जाईल. या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळाल्यास भुजबळांना काम करावे लागेल. भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचे काम करू, अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

The post भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध appeared first on पुढारी.