नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’

विखे थोरात,www.pudhari.news

नगर : संदीप रोडे
राजकारणात कोणी कोणाचा शत्रू-मित्र नसतो, असे नेहमी म्हटले जाते; पण नगर जिल्ह्यातील विखे-थोरात त्याला अपवाद आहेत. दोघांचेही नेतृत्व बलाढ्य, प्रभावी तसेच शक्तिशाली. विद्यमान भाजपचे ज्येष्ठ नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांचे माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्याशी कधी सूर जुळले नाहीत. आता दोघांचे पक्ष वेगवेगळे झाल्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या निमित्ताने दोघेही आमने-सामने ठाकणार असल्याचे चित्र आहे. दोघांच्याही नेतृत्वाचा कस लावणारी ही निवडणूक राज्याचे लक्ष वेधणारी ठरणार आहे.

माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने त्यापूर्वीच निवडणूक होणार आहे. प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. पदवीधारक मतदार असलेल्या या मतदारसंघातील मतदार नोंदणीची मुदत 7 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यानंतर मतदारयादी अंतिम करून केव्हाही निवडणूक जाहीर होऊ शकते. आ. तांबे यांना काँग्रेस-डीटीएफ संघटनेने उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्ष शिवसेना, राष्ट्रवादीने अजून तरी आपली भूमिका जाहीर केलेली नाही. उमेदवारी निश्चितीसाठी महाविकास आघाडीची बैठक नियोजित आहे. मात्र, त्यापूर्वीच आ. तांबे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ तसा भाजपचा; पण प्रताप सोनवणे यांनी राजीनामा दिल्यानंतर 2009 पासून तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. डॉ. सुधीर तांबे यांनी 2009 ची निवडणूक लढवीत त्यावर काँग्रेसचा झेंडा फडकावला. त्यावेळी आ. तांबेंना जेमतेम दहा महिन्यांचा कालावधी मिळाला. 2010 मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून पुन्हा डॉ. तांबे निवडणुकीच्या मैदानात उतरले. 2010 ला भाजपचे प्रसाद हिरे व 2016 ला सुहास फरांदे यांचा पराभव करत डॉ. तांबे तिसर्‍यांदा पदवीधरचे आमदार झाले. यापूर्वीच्या निवडणुकीची सूत्रे आ. थोरात यांच्याकडेच होती, महसूलमंत्री विखे-पाटील हे तेव्हा काँग्रेसमध्ये होते. आता मंत्री विखे-पाटील हे भाजपचे मंत्री आहेत, तर थोरात काँग्रेसचे नेतृत्व करताहेत.

डॉ. विखेंचे नाव आग्रभागी : भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली नसली, तरी मंत्री विखे-पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे यांचे नाव अग्रभागी असल्याची चर्चा आहे. धुळ्यातून धनराज विसपुते, शुभांगी पाटील हेही भाजपकडून इच्छुक असले, तरी अंतिम निर्णय पक्षाच्या कोअर कमिटीतच होणार असल्याचे समजते.

नगरचे माजी नगरसेवक धनंजय जाधव हेही भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या पत्नी सुप्रिया जाधव हे नगर महापालिकेत काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. धनंजय जाधव हे पूर्वीश्रमीचे आ. थोरात यांचे समर्थक; पण आता ते भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासोबत आहेत. त्यामुळेच भाजपकडील इच्छुकांमध्ये धनंजय जाधव यांचेही नगरमधून नाव पुढे आले आहे.

मतदार नोंदणीचा निरुत्साह :

राजकीय पक्षाच्या यंत्रणा मतदार नोंदणीसाठी धावपळ करत असल्या, तरी दिवाळी सुट्ट्यांमुळे नोंदणीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. 2016 च्या निवडणुकीवेळी नाशिक, नगर, धुळे, नंदुरबार आणि जळगावातील 54 तालुक्यांतून तीन लाख मतदार होते. आजपर्यंतच्या मतदार नोंदणी प्रक्रियेत नगरला 14 हजार, नाशिक 25 हजार, तर जळगावात 10 हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे मतदारांचा घटलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

भाजपची जबाबदारी विखेंवर
नाशिक पदवीधर मतदारसंघावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळविण्यासाठी भाजपने आ. थोरातांच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी मंत्री विखे यांच्यावर जबाबदारी सोपवत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विखेंच्या ‘प्रवरे’ची यंत्रणा मतदार नोंदणीसाठी सक्रिय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नववर्षारंभीच नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत असून, हा मतदारसंघ मिळविण्यासाठी भाजपनेही तयारी चालविली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भाजपची, तर माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने विद्यमान महसूलमंत्री विखे आणि त्यांचे राजकीय पारंपरिक विरोधक माजी महसूलमंत्री आ. थोरात आमने-सामने येणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विखे-थोरात ‘आमने-सामने’ appeared first on पुढारी.