नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली

हातगाडी पेटवली

सिडको : पुढारी वृत्तसेवाफळविक्रेत्या व्यावसायिकाच्या फळांच्या कॅरेटसह लोखंडी हातगाडा, वजनकाटा डिझेल टाकून पेटवून देत आर्थिक नुकसान केल्याची घटना कामटवाडा येथे घडली. या घटनेत फळविक्रेत्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्याने या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. दरम्यान संशयिताने हातगाडी पेटवल्यानंतर मोटरसायकलवरुन पळ काढल्याची माहितीही मिळाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी कृष्ण माणिकराव डक (रा. मुस्कान सोसायटी, वडाळा-पाथर्डीरोड, नाशिक) यांचा फळविक्रीचा व्यवसाय असून, ते अॅपेरिक्षाद्वारे होलसेल मार्केटमधून फळ घेऊन येतात व दिवसभर फळ विक्री करून रात्री अॅपेरिक्षा घराजवळ उभी करतात. डक हे अंबड एमआयडीसीमध्ये सुलभा चौधरी यांच्या मालकीच्या प्लॉटवर कोणी अतिक्रमण करु नये म्हणून तेथे राहतात. या प्लॉटला तारेचे कंपाऊंड केलेले असून, एका बाजूला लोखंडी गेट बसवलेले आहे. या ठिकाणी फिर्यादी डक हे अॅपे रिक्षा व फळांचे कॅरेट ठेवत असतात. दि. १५ मार्च रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास मार्केटमध्ये फळे खरेदी करण्यासाठी जायचे असल्याने डक हे प्लॉटवर असलेली अॅपेगाडी घेण्यासाठी आले होते. मात्र त्यावेळी गेट उघडे होते व कुलूप खाली पडलेले होते. डक यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी फळांनी भरलेले कॅरेट पुर्णपणे जळालेले होते. तर काही कॅरेट अर्धवट जळालेले होते. तसेच २ हातगाड्यांचा लाकडी साठा तुटलेला होता. तर इतर दोन हातगाड्या तसेच त्यांच्यावरील छत्री व जुना वजनकाटा हे साहित्य अस्तव्यस्त पडलेले होते. ही माहिती फिर्यादी डक यांनी त्यांच्या मोठ्या भावास कळवली. त्यानंतर ते काही वेळात प्लॉटवर आले.

हातगाडीला आग लावून मोटारसायकलवरुन पळून गेला

दरम्यान दि. १५ मार्च रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास फिर्यादी डक व सागर साखरे हे दोघे जण पवननगर येथे उभे होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीचा इसम विनोद बोराडे (रा. कामटवाडा, अंबड) हा मोटारसायकलवर तेथे आला. त्याने मित्राच्या गाडीचे पेट्रोल संपले असून, माझ्यासोबत चला, मी राणेनगर येथील पेट्रोल पंपावर बाटलीमध्ये डिझेल घेतो असे सांगितले. त्यानंतर मोटारसायकलवर बसून बोराडे याने फिर्यादी डक यांना इंडोलाईन फर्निचरजवळ सोडले. त्यानंतर गाडीमध्ये डिझेल टाकून येतो असे सांगून बोराडे मोटरसायकलवर निघून गेला. परंतु बराचवेळ वाट पाहूनही बोराडे परत न आल्याने फिर्यादी व त्यांचा मित्र जनता स्वीटकडे जात होते. तेव्हा एका जणाने असे सांगितले की, विनोद बोराडे हा डक यांच्या प्लॉटमध्ये असलेले कॅरेटजवळ डिझेल टाकत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने ह्या कॅरेटला व हातगाड्यांना आग लावून मोटारसायकलवरुन पळून गेला. त्यावेळी फिर्यादी डक यांच्याकडे फोन नसल्याने तो कोणाशीही संपर्क साधू शकले नाही. त्यानंतर त्यांनी ही माहिती एमआयडीसी पोलीस चौकी येथे दिली. तसेच ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने मदत केली. त्यावेळी फिर्यादी डक यांच्या लहान बहिणीचे लग्न असल्याने त्यांना कुटुंबियांसह मुळ गावी परभणी येथे गेले होते. त्यावेळी लग्न आटोपून आल्यानंतर कृष्णा डक यांनी काल अंबड पोलीस ठाण्यात विनोद बोराडे याच्याविरुद्ध जाळपोळीची फिर्याद दिली असून, या घटनेत १० हजार रुपये किंमतीचे १०० प्लास्टिकचे कॅरेट व १ हजार रुपये किंमतीचा हातगाडीचा लाकडी साठा जाळून आर्थिक नुकसान केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या अंबडला फळ विक्रेत्याची हातगाडी डिझेल टाकून पेटवली appeared first on पुढारी.