नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात शिरला बिबट्या

आरोग्य विज्ञान विद्यापीठात बिबट्या www.pudhari.news

नाशिक : शहरात चक्क आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये बिबट्या घुसल्याची घटना सोमवारी ( दि. 13) घडली. सावज व पाण्याच्या शोधात बिबट्या थेट विद्यापीठातील अतिथी गृहात शिरल्याने खळबळ उडाली. सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान बिबट्या कॅम्पसमध्ये दिसल्यावर तत्काळ वनविभाग पथकास पाचारण करण्यात आले. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्तांनी बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलं. त्यानंतर कॅम्पसमध्ये साऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

नाशिक शहरात बिबट्या घुसल्याच्या घटना या आधीही अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे नाशिक आणि बिबट्या असं समीकरणच आता होऊ लागलं आहे.  बिबट्याने यावेळी तर चक्क शहरापासून दूर असलेलं आरोग्य विज्ञान विद्यापीठ गाठलं अन्  विद्यापीठाची सैर केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी (दि. १३) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बिबट्या विद्यापीठाच्या कॅम्पस मध्ये शिरला. त्याने थेट अतिथी गृह गाठून तिथेच ठाण मांडले. अतिथी गृहाच्या खोलीत एका कोपऱ्यात बिबट्या बसून राहिला. तितक्यात वन पथकाने ‘ट्रँक्युलाइज गन’द्वारे बिबट्याला बेशुद्ध केले. पहिल्या ‘डार्ट’मध्ये बिबट्या बेशुद्ध झाल्यावर त्याला जाळीबंद करुन पिंजऱ्यात टाकण्यात आले.

दरम्यान, साडेतीन वर्षाचा नर बिबट्याला वन विभागाच्या रोपवाटीकेत ठेवण्यात आले आहे. त्याला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी सांगितले. सुदैवाने कॅम्पसमध्ये फिरणाऱ्या बिबट्याने कोणावरही हल्ला न केल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

हेही वाचा –