नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्यानंतर आता गोडसे यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीनेदेखील मास्टर प्लॅन तयार केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात नुकतेच नाशिक दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाने विजय करंजकर यांचे नाव उमेदवारीसाठी निश्चित केले असले, तरी शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते.
नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात सुरू असलेली रस्सीखेच अद्याप कायम असली, तरी शिंदे गटाचे युवा नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये तीन दिवसांपूर्वी आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नाशिकमधून गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर करत सर्वांनाच धक्का दिला आहे. महाविकास आघाडीत नाशिकच्या जागेवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मूळ दावा आहे. ठाकरे गटाकडून यापूर्वीच विजय करंजकर यांची उमेदवारीही घोषित करण्यात आली असून, करंजकर निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारसंघात त्यांचे दौरे सुरू असून, सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे. मात्र आता गोडसेंना धूळ चारण्यासाठी सक्षम उमेदवाराची चाचपणी महाविकास आघाडीने सुरू केल्याचे बोलले जात आहे. शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात येते. पिंगळे यांना ठाकरे गटात प्रवेश देऊन ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासंदर्भात खल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर होते. जवळपास दीड ते दोन तास त्यांनी एकाच गाडीत प्रवास केला. याच दरम्यान नाशिकच्या जागेवरून पवार आणि राऊत यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. अर्थात या वृत्तास अद्याप दुजोरा मिळू शकलेला नाही. शनिवारी (दि. १६) करंजकर यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाच्या युवा सेनेसह युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा संयुक्त युवा महाराष्ट्राभिमान मेळावा पार पडला. या मेळाव्यातील उत्साह करंजकर यांच्या उमेदवारीला बळ देणारा ठरला.
हेही वाचा:
- गोव्याजवळ काजूबियांची वाहतूक करणारा ट्रक नदीत कोसळला; ६ जण मृत्युमुखी पडल्याची भीती
- R Ashwin on MS Dhoni : ‘आयुष्यभर धोनीचा ऋणी राहीन’, अश्विनने IPL पूर्वी असे का म्हटले?
- शाहू महाराज यांना उमेदवारी, हे शरद पवारांचे षड्यंत्र; खा. संजय मंडलिक यांचा घणाघात
The post नाशिकच्या उमेदवारीबाबत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात चर्चेची खलबते appeared first on पुढारी.