नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

छगन भुजबळक, हेमंत गोडसे (1)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांना की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मिळणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता या वादात पुन्हा एकदा भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराच भाजपच्या मंडल अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीतील संघर्ष अधिकच टोकाला जाण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या उमेदवारीवरून महायुतीतील जागावाटप रखडले आहे. या जागावाटपाचा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी हेमंत गोडसे यांना जाहीर केली होती. त्यानंतर महायुतीतील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर उमटला. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून या जागेवर दावा करण्यात आला. छगन भुजबळ हे नाशिकच्या जागेवर उमेदवार असतील, असे संकेत मिळाल्याने गोडसेंची धाकधूक वाढली होती. त्यामुळे गोडसे मुंबईत तीन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. नाशिकच्या जागेवरून शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरू असताना आता भाजपने देखील नाशिकच्या उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या काही मंडळ अध्यक्षांनी ही जागा नाशिकला न मिळाल्यास राजीनाम्याचा देण्याचा इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना मंडल अध्यक्षांनी हा इशारा दिला आहे. त्यामुळे नाशिकची जागा कुणाला मिळणार?, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा appeared first on पुढारी.