नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात, 5 ठार, 3 जखमी

नाशिकच्या दिंडोरी -म्हसरुळ रोडवर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी २ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला.

या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आज, एका बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान घटनास्थळी म्हसरुळ पोलिस दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. दरम्यान याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.

टायर फुटल्याने घडला अनर्थ

दिंडोरी रोडवर ग्लोबल स्कूल जवळ बोलेरोचे टायर फुटून हा भीषण अपघात झाला. वणी दर्शनावरुन परतत असताना या पाचही भाविकांचा काळाने घात केला. अपघात द्राक्ष व्यापारी रमकेश यादव,  मुकेश यादव यांचेसह पाच जण ठार झाले आहेत. तर तीन जखमी आहेत.

बोलेरो जीप मधील व्यक्ती हे सप्तश्रृंगी देवीचं दर्शन घेऊन परतत होते. या बोलेरो जीपच्या चालकाचा ताबा सुटल्यानंतर हा अपघात झाल्याचा संशय प्रत्यक्षदर्शी आणि मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केलाय. दुचाकीवरील दोघांचाही यात जागीच मृत्यू झालाय. रुग्णवाहिका देखील उशिरा आल्याचा आरोप मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींनी केलाय.

The post नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात, 5 ठार, 3 जखमी appeared first on पुढारी.