नाशिकच्या सौंदाणेत राहुल गांधी करणार मुक्काम ! १५ एकरात उभी राहतेय कंटेनर वस्ती

राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा www.pudhari.news

उमराणे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- काँग्रेसची महत्त्वाकांक्षी भारत जोडो न्याय यात्रा खान्देशात दाखल झाली असून, ती बुधवारी (दि.१३) मालेगावात येणार आहे. विशेष म्हणजे खासदार राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते त्यांच्यासमवेत मुंबई-आग्रा महामार्गावरील सौंदाणे गावात मुक्कामी राहतील. त्यादृष्टीने याठिकाणी तब्बल १५ एकर क्षेत्रात व्यवस्था केली जात असून, एका दिवसासाठी लक्षवेधी असे कंटेनर गावच वसत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन उपलब्ध करून दिली आहे. (Bharat Jodo Nyaya Yatra Nashik)

दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा १५ जानेवारीपासून मणिपूर येथून मुंबईच्या दिशेने निघाली. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना ही यात्रा नाशिक जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. दोन पंचवार्षिकपासून बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकण्याच्या दृष्टीने या यात्रेचे नियोजन होताना दिसते. त्यातही जिल्हाध्यक्ष असलेल्या डॉ. तुषार शेवाळे यांच्या मालेगाव तालुक्यातच यात्रेचा मुक्काम पडणार असल्याने त्यांच्या नियोजन आणि संघटनबांधणीची ही परीक्षा ठरणार आहे. खासदार गांधी यांसह ३०० हून अधिक पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांचा जत्था असलेले हे चालते फिरते गाव सौंदाणेत विसावा घेणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था सुमारे १५ एकर जागेवर केली जात आहे. रविवार (दि.१०)पासून जागा सपाटीकरण सुरू झाले आहे. (Bharat Jodo Nyaya Yatra Nashik)

अशी असेल व्यवस्था (Bharat Jodo Nyaya Yatra Nashik)

काँग्रेस नेते गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांच्या रात्र मुक्कासाठी सौंदाणे सज्ज होतेय. अत्यावश्यक त्या सुविधांयुक्त ४० कंटेनर हाउसची व्यवस्था लावली जात आहे. वाढते तापमान लक्षात घेऊन वातानुकूलित यंत्रणा असेल. याठिकाणीच भोजनाचे नियोजन आहे. सकाळी नेतेमंडळी तयार होऊन चांदवडमार्गे नाशिककडे रवाना होतील. त्यामुळे रात्रभरासाठी सौंदाणे गावाला व्हीआयपींचा राबता अनुभवता येणार आहे. शिवाय पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कृषी, सिंचन आदी समस्यांवर गांधी यांच्याशी चर्चेची संधीही मिळणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या सौंदाणेत राहुल गांधी करणार मुक्काम ! १५ एकरात उभी राहतेय कंटेनर वस्ती appeared first on पुढारी.