देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच

बिबट्या pudhari.news
नाशिक (देवळाली कॅम्प ): पुढारी वृत्तसेवा
येथील जुनी स्टेशनवाडी जवळील पगारे चाळ लगतच्या नाल्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात मंगळवार (दि.१२) रोजी  पहाटे बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यात याच ठिकाणावरून तीन बिबटे जेरबंद केले आहे. मात्र अजूनही दोन ते तीन बिबटे परिसरात मोकाट फिरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून, वनविभागाने पुन्हा या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी  जोर धरू लागली आहे.
दोन महिन्यापूर्वी देवळाली कॅम्प जुनी स्टेशन वाडी, पगारे चाळ जवळील भिंतीवर तीन बिबटे मुक्त संचार करीत असल्याचा व्हिडिओ समाजमध्यमावर दिसत होता. त्यामुळे रहिवाश्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या ठिकाणी वन विभागाला सततची मागणी करून पिंजरा लावण्यात आला होता. पहाटे पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. बिबटया्ने फोडलेल्या डरकाळीने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर काही बघ्यांनी पिंजऱ्याकडे धाव घेतली असता त्यांना बिबट्या जेरबंद झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने वन विभागाला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती दिली.  त्यानुसार वनविभागाचे वन रक्षक विजयसिंह पाटील, अशोक खानझोडे, अंबादास जगताप, प्राणी मित्र विक्रम कडाळे हे घटनास्थळी दाखल झाले. बिबट्यास रेस्क्यू करून ताब्यात घेण्यात आले. दोन महिन्यात तिसरा बिबट्या जेरबंद झाला असून तो  चार वर्षाचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.  त्यास गंगापूर रोपवाटिका येथे पाठवण्यात आले आहे. या ठिकाणी बिबट्यावर वैद्यकीय उपचार करून त्यास पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल. जेरबंद बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. या भागातील स्थानिक नागरिक सुयोग तपासे, सतीश भालेराव, रुपेश केदारे, राहुल उन्हावणे, सिद्धेश भवर, विमल भवर, अलका जगताप यांनी या परिसरात आणखी 2 ते  3 बिबटे असून त्यांना देखील पकडण्यासाठी तत्काळ पिंजरा लावावा अशी मागणी होत आहे.
लष्करी भागातून येतात बिबटे
देवळाली कॅम्प परिसरात लष्कराची छावणी असून बाजूला असलेल्या जंगल व डोंगर भागातून बिबटे नागरी भागात येतात. पिण्याचे पाणी व भक्ष यांच्या शोधात बिबटे गेल्या काही वर्षापासून थेट नागरी भागात येत असल्याने यावर वनविभाग व लष्करी अधिकारी यांनी ठोस तोडगा काढणे गरजेचे आहे.

The post देवळालीत बिबट्या जेरबंद मात्र अद्यापही दोन ते तीन बिबटे मोकाटच appeared first on पुढारी.