नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; जप्त केलेला ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस हवालदारासह युवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. नाशिक तालुका पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेला हवालदार रवींद्र बाळासाहेब मल्ले व त्याच्यासोबत तरुण मोहन तोडी अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. (Nashik Bribe News)

हवालदार मल्ले हा विल्होळी पोलिस चौकी येथे सेवा बजावत होता. या ठिकाणी एका ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. हा ट्रक सोडवण्याच्या मोबदल्यात मल्लेने तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाने तक्रारीची शहानिशा करीत सापळा रचला. तडजोड करत मल्लेने ७० हजार रुपयांची लाच घेतल्याचे मान्य केले. पंचवटीतील हिरावाडी येथील ओम नागपूर ट्रान्स्पोर्ट येथे ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील संशयित तरुण तोडी याने तक्रारदाराकडून लाचेची ३५ हजार रुपयांची रक्कम घेतली. विभागाने त्याला रंगेहाथ पकडले. पंचवटी पोलिस ठाण्यात हवालदार मल्ले याच्यासह तरुण तोडी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. (Nashik Bribe News)

The post नाशिकचा लाचखोर पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.