पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हिरावाडी रोडवरील शिवमनगरमध्ये मनपाच्या उद्यानालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर ठेवलेल्या शेतीपयोगी प्लास्टिक पाइपांना अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.३) सायं. ४ च्या सुमारास घडली आहे. यात चारचाकी वाहनासह उद्यानातील झाडे, प्लास्टिक पाइप, उद्यानातील खेळणी जळून खाक झाली. Nashik Fire News
याबाबत माहिती अशी की, हिरावाडी रोडवरील शिवमनगरमध्ये इंद्रकुंड येथील ठक्कर यांचे आशिष मशीनरी हे शेतीपयोगी अवजारे विक्रीचे दुकान आहे. त्यांनी दुकानातील विक्रीचे काही साहित्य, पाइप या मोकळ्या भूखंडावर ठेवलेले होते. शुक्रवारी सायं. ४ च्या सुमारास या पाइपांना अचानक आग लागली. आग लागल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ अग्निशामक दल व पोलिसांना माहिती दिली. दोन बंबांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलास यश आले. यावेळी पंचवटी पोलिस ठाण्याचे कर्मचारी व अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी एस. के. बैरागी, लीडिंग फायरमन संजय कानडे, व्ही. आर. गायकवाड, डी. पी. पाटील, ए. बी. सरोदे, डी. पी. बोरसे, बापू परदेशी, संदीप जाधव व ट्रेनिंग फायरमन यांनी आग विझविली. Nashik Fire News
परिसरातील नागरिकांची तत्परता
शिवमनगर उद्यानालगत लागलेली आग इतकी भीषण होती की, मोकळ्या भूखंडात उभी असलेली कार (एमएच १५, जेएम ८१००) जळून खाक झाली. तर लगतच्या उद्यानात असलेले साहित्य, झाडे, प्लास्टिक पाइपही जळून खाक झाले. या आग लागलेल्या पाइपलगत एक टाटा सुमो, एक आयशर, व्हेरिटो अशी चार वाहने लावलेली होती. मात्र, परिसरातील नागरिकांच्या तत्परतेने सदरची वाहने तातडीने हलविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.
उद्यानातील सुकलेल्या पालापाचोळ्यामुळे आग लागली असावी, अशी शंका परिसरातील नागरिकांना आहे. रोज उद्यानाची साफसफाई करत असताना उद्यानातील कचरा व पालापाचोळा या भिंतीलगत जमा केला जातो. या सुकलेल्या पालापाचोळ्याला तीव्र उन्हामुळे आग लागली व त्या शेजारी ठेवलेल्या प्लास्टिकच्या पाइपापर्यंत ही आग पोहोचल्याने ही घटना घडल्याचा अंदाज आहे. -चंद्रशेखर पंचाक्षरी, रहिवासी
हेही वाचा –