नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी

जायकवाडी धरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

चालूवर्षी पावसाने दडी मारल्याने नाशिक जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यातच यंदा जिल्ह्यातून अवघे ६.१ टीएमसी पाणी जायकवाडीत पोहचले आहे. दुष्काळी परिस्थिती बघता मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी गोदावरीच्या ऊर्ध्व खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी होऊ शकते. त्यामूळे येत्याकाळात पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होेताना नाशिक-नगर विरूद्ध मराठवाडा असा वाद पेटण्याची शक्यता आहे.

अलनिनोच्या प्रभावामुळे यंदाच्यावर्षी पावसाने महाराष्ट्रावर अवकृपा केली आहे. उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात सप्टेंबरच्या प्रारंभीच दुष्काळाची दाहकता जाणवायला सुरवात झाली आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याच्या थेंबा-थेंबाचे नियोजनासाठी स्थानिक पातळीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत सरासरीच्या ५६ टक्के कमी पर्जन्य झाले आहे. अर्धाअधिक जिल्ह्यात सध्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे. त्यामुळे पाण्याच्या काटेकाेर नियोजनसाठी प्रशासन सरसावला आहे. जिल्हावासीयांची तहान भागविण्यासाठी प्रशासन एकीकडे सरसावले असताना यंदा मराठवाड्याला अवघे ६.१ टीमएसी म्हणजेच ६ हजार १०० दलघफू पाणी पोहचले आहे.

मराठवाड्यातही कमी पर्जन्य झाले आहे. अशावेळी जायकवाडीच्या ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातून अतिरिक्त पाण्याची मागणी केली जाऊ शकते. मात्र, नाशिक व नगरमध्ये पावसाने अपेक्षाभंग केल्याने धरणांमध्ये मर्यादित पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची मागणी पूर्ण करताना दाेन्ही जिल्ह्यातील प्रशासनाच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामध्ये मराठवाड्याकडून पाण्याची मागणी अतिरिक्त झाल्यास ते आणायचे कोठून असा प्रश्न प्रशासनासमोर ऊभा ठाकला आहे.

चार वर्षे जायकवाडी भरले

नाशिक जिल्ह्यात मागील ४ वर्षात चांगला पाऊस झाला. त्यामुळे नाशिकच्या धरणांमधून सोडलेल्या पाण्यावर जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरले होते. या पाण्यावर मराठवाड्याची तहान व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला होता. परंतूु, यंदा नाशिकवरच दुष्काळाचे गंभीर संकट घोंगावते आहे. त्यामुळे मराठवाड्याची तहान भागविणे मुश्कील होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमधून मराठवाड्याला सहा टीएमसी पाणी appeared first on पुढारी.