नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होणार, उद्योगमंत्र्यांकडून हमी 

उद्योगमंत्री उदय सामंत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पालकमंत्री दादा भुसे यांनी इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची मागणी केल्यानंतर मी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर बाेललो. तेव्हा दादा मागणी करीत असतील तर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर मंजूर करूनच परता, असे मला एमआयडीसीच्या सीईओंनी सांगितले. त्यामुळे तुम्ही क्लस्टरसाठी जागा सुचवा, इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची हमी देतो, अशा शब्दांत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

त्र्यंबक रोड येथील आयटीआय महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित चार दिवसीय ‘निमा पॉवर प्रदर्शन २०२३’च्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, निमा अध्यक्ष धनंजय बेळे, प्रदर्शनाचे चेअरमन मिलिंद राजपूत, एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली मुळे, व्यवसाय प्रशिक्षण सहसंचालक प्रफुल वाकडे, एबीबीचे महाव्यवस्थापक गणेश कोठावदे, निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सिद्धार्थ शहा, विवेक गर्ग, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, सहसंपर्कप्रमुख सूर्यकांत लवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, निमाचे सरचिटणीस राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री भुसे यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाशिकवर विशेष प्रेम असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाशिकवर लक्ष आहे. त्यातच उद्योगमंत्री सामंत जागेवर निर्णय घेण्यासाठी ओळखले जात असल्याने नाशिकमध्ये ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’चा तत्काळ निर्णय घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर निमा अध्यक्ष बेळे यांनीही केंद्राने महाराष्ट्रासाठी दोन इलेक्ट्राॅनिक क्लस्टर मंजूर केले असून, पैकी एक पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे होणार असून, दुसरे क्लस्टर नाशिकला व्हावे, अशी मागणी केली. त्यावर ना. सामंत म्हणाले की, ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची हमी मी घेतो, पण जागा तुम्ही सुचवा. सध्या आपण दिंडोरी, घोटी तसेच जुन्या एमआयडीसींचा विस्तार करीत आहोत. त्यामुळे जागेचा तोटा नाही. पण अशातही क्लस्टरसाठी जागा सुचविण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना देतो. त्यांच्याशी चर्चा करून तुम्ही सांगाल त्या जागेवर इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभारण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्लस्टर सुरू झाल्यानंतर बाहेरच्या कंपन्यांचे स्वागत करताना स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेऊन त्यामध्ये आपले अँकर युनिट उभारण्याचा शब्द द्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली. उद्योजकांनी उद्योगमंत्र्यांच्या या घोषणा तसेच अपेक्षेचे स्वागत केले. परी ठोसर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले, तर मिलिंद राजपूत यांनी आभार मानले.

उद्योजकांना दावोसचे निमंत्रण

पुढच्या दावोस परिषदेसाठी नाशिकच्या उद्योजकांनी यावे. तसेच परिषदेत नाशिकची बलस्थाने सांगावीत, जेणेकरून नाशिकला नवे गुंतवणूक येण्यास मदत होईल, असे निमंत्रणच उद्योगमंत्री सामंत यांनी नाशिकच्या उद्योजकांना दिले.

तर पोलिसांत तक्रार करा

माथाडी कामगारांच्या संघटना काढायच्या अन् उद्योजकांना त्रास द्यायचा असा जर प्रकार समोर येत असेल तर थेट पोलिसांत तक्रार करा, असेही ना. सामंत यांनी सांगितले. मात्र, एखाद्या माथाडी कामगारावर अन्याय होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

एक्झिबिशन सेंटरची घाेषणा

एक्झिबिशन सेंटर नाही, असे सांगितले गेले. पालकमंत्री दादा भुसे यांनी तारीख ठरवावी, आपण एक्झिबिशन सेंटरचे भूमिपूजन करून टाकू, असे सांगताना ना. सामंत यांनी, भविष्यात दादा भुसे यांनी सेंटरचे उद्घाटन केले होते हेदेखील लक्षात ठेवा, अशी आठवणही उद्योजकांना करून दिली. त्याचबरोबर क्लस्टर, पार्क, सेंटर या मागणी आम्ही पूर्ण करू, असेही ना. सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये इलेक्ट्रॉनिक क्लस्टर होणार, उद्योगमंत्र्यांकडून हमी  appeared first on पुढारी.