नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिकमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे व भारती पवार यांचा उमेदवारी अर्ज आज (दि. 2) भरला जातो आहे. त्यासाठी महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात असून यादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते व महायुतीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे बघायला मिळाले.
बीडी भालेकर मैदानापासून महायुतीच्या रॅलीला सुरुवात झाली. रॅली शालीमार परिसरात आली असता त्या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यालय असल्याने महायुती व ठाकरे गटाचे कार्यकर्ते यावेळी समोरासमोर आले. महायुतीचा प्रचार सुरु असताना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी मशाली पेटवल्या व घोषणाबाजी केली. तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. या रॅलीत उपमुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस हेही सहभागी झाले होते.
नाशिकमध्ये काल शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे व महायुतीचे हेमंत गोडसे असा सामना पाहायला मिळणार आहे. प्रत्यक्षपणे ही लढाई ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना अशीच होणार आहे. तर दिंडोरीत महायुतीच्या भारती पवार विरोधात महाविकास आघाडीचे भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे. महायुतीच्या आधीच महाविकास आघाडीच्या दोनही उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहे. आज भारती पवार व हेमंत गोडसे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
हेही वाचा –