नाशिकमध्ये पुन्हा बनावट नोटा जप्त, दोन महिला गजाआड

नाशिक बनावट नोटा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सिडकोतील ५०० रुपये किंमतीच्या ५० बनावट नोटा आढळून आल्यानंतर नाशिकरोड येथील मुक्तीधाम परिसरातही दोन महिलांकडे ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाने दोन महिलांना पकडले असून दोघींविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुजा अनिल कहाणे (रा. जेलरोड) व स्वाती देविदास अहिरे (रा. दसक पंचक) अशी पकडलेल्या दोन संशयित महिलांची नावे आहेत. गुंडा विरोधी पथकातील अंमलदार विजय सुर्यवंशी यांना मिळालेल्या माहितीनुसार, संशयित पुजा हिच्याकडे स्वाती अहिरेने ५ ते ६ दिवसांपूर्वी ५०० रुपयांच्या २० नोटा दिल्याचे समजले. पुजा हिला खर्च करण्यासाठी स्वातीने १० हजार रुपये बनावट नोटा दिल्या होत्या. मात्र या नोटा बनावट असल्याचे समजल्याने पुजा हिने स्वातीला बोलवून नोटा परत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी दोघी मुक्तीधाम परिसरात भेटणार होत्या. ही बाब सुर्यवंशी यांनी वरिष्ठांना सांगितली. त्यानुसार पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. दरम्यान, स्वाती हिने पुजाकडून पैसे परत घेताना बनावट नोटांबाबत कोणालाही न सांगण्याची विनंती केली होती. पथकाच्या महिला अंमलदार सुवर्णा गायकवाड यांनी दोघींना नोटा स्विकारताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनी तपासणी केली असता पिशवीतील नोटा बनावट आढळून आल्या. नोटांवरील महात्मा गांधी यांचा वॉटर मार्क खऱ्या नोटांसारखा नव्हता, तसेच सिक्युरीटी थ्रेटही आढळून आले नाही. त्याजागी हिरवी पट्टी लावल्याचे पोलिसांना आढळले. त्यामुळे पोलिसांनी दोघा महिलांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. स्वातीने बनावट नोटा चलनात आणण्यासाठी पुजाला दिल्याने व नोटा बनावट आहे ही माहिती असतानाही त्या स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी पुजा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार विजय सुर्यवंशी, डी. के. पवार, राजेश सावकार, प्रदिप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

सिडकोतील कनेक्शन शोधण्याचा प्रयत्न

दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी ५० बनावट नोटा जप्त करीत संशयितांना अटक केली अहे. त्यामुळे शहर पोलिसांनी मुक्तीधाम येथे दोघींकडून जप्त केलेल्या व सिडकोतून जप्त केलेल्या नोटांची सखाेल चौकशी सुरु केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही घटनांमध्ये नोटांची बनावट वेगवेगळी असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

नोटांचा निवडणूकीशी संबंध?

शहर पोलिसांनी बनावट नोटांप्रकरणी दोन ठिकाणी कारवाई केल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. बनावट नोटांचे रॅकेट कोण चालवत आहे याविषयी चर्चा रंगल्या आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी बनावट नोटा दिल्याचीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

हेही वाचा –