नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका

Nashik Police www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-पोलिस अधीक्षक पदभार स्वीकारल्यानंतर विक्रम देशमाने यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवरील कारवाईतील सातत्य कायम ठेवले आहे. बुधवारी (दि.७) दिवसभरात ग्रामीण पोलिसांनी जुगार, मटके, अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ५२ गुन्हे दाखल करीत त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Nashik Police)

तत्कालीन पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गत वर्षभरात अवैध धंद्यांवर कारवाई करीत सुमारे २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर त्यांची नुकतीच मुंबईत बदली झाली असून, त्यांच्या जागी विक्रम देशमाने यांची नियुक्ती झाली आहे. देशमाने यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाच दिवसांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाईचे शस्त्र उगारले. त्यामुळे अवैध धंद्यावरील कारवाईचे सातत्य कायम राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. देशमाने यांनी सोमवारी (दि. ५) त्यांनी पोलिस ठाणे, अधीक्षक कार्यालय व सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यात सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध धंदे बंद ठेवण्याचे आदेश देशमाने यांनी दिले. तसेच कोणत्याही स्वरूपात निष्काळजीपणा करू नये, कारवाईत सातत्य ठेवण्याचेही आदेश दिले. त्यानुसार अपर पोलिस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी नाशिक, तर अनिकेत भारती यांनी मालेगाव विभागातील पोलिस ठाणे व पथकांना सूचना दिल्या. यासह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकांनीही गोपनीय माहितीद्वारे छापेमारीचे नियोजन केले. गुरुवारी दिवसभरात बाऱ्हे, येवला तालुका, निफाड पोलिसांत प्रत्येकी तीन, इगतपुरी, वडनेर भैरव, वडनेर खाकुर्डी, एमआयडीसी सिन्नर, नांदगाव, पेठ, हरसूल, सिन्नर, चांदवड, घोटी, वाडीवऱ्हे, वावी, सायखेडा पोलिसांत प्रत्येकी दोन, तर नाशिक तालुका, मनमाड, सटाणा, जायखेडा, येवला शहर, वणी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, किल्ला, दिंडोरी, कळवण, रमजानपुरा, लासलगाव या पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे गुन्हे दाखल करून पोलिसांनी अवैध धंदेचालकांना दणका दिला आहे. (Nashik Police)

५४ जणांविरोधात ५२ गुन्हे (Nashik Police)

अवैध दारू, हातभट्टी, विक्री-वाहतुकीचे ४९ गुन्हे दाखल करीत ५० संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. तर जुगार खेळणाऱ्या व खेळविणाऱ्यांविरोधात २ गुन्हे दाखल केले. त्याचप्रमाणे अमली पदार्थ प्रकरणी दोघांविरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमधील अवैध मद्यविक्रेत्यांविरोधात कारवाईचा धडाका appeared first on पुढारी.