नाशिक : पुढारी वृत्तसेवा – उत्तर महाराष्ट्राच्या कक्षेत येणाऱ्या सहा लोकसभा क्षेत्रांचे समतल वाटप करीत जनता जनार्दनाने महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी तीन जागा पारड्यात टाकल्या आहेत. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजे यांनी विजयी मशाल पेटवली, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी दिंडोरीत तुतारीचा निनाद करून जायंट किलरचा किताब मिळवला. माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी चुरशीच्या लढतीत धुळ्यात बाजी मारली. आदिवासी बहुल नंदनगरीत नवख्या ॲड. गोवाल पाडवी यांनी लक्षवेधी विजयाची नोंद करीत काॅंग्रेसचा गमावलेला गड काबीज केला. जळगावमध्ये स्मिता वाघ, तर रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी भाजपची पताका पुन्हा फडकावली. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा दिंडोरीत धक्कादायक पराभव झाला, तर हॅट्ट्रिकच्या उंबरठ्यावर असलेल्या हेमंत गोडसे तसेच डॉ. हीना गावित यांना अनुक्रमे नाशिक व नंदुरबारमध्ये पराजयाला सामोरे जावे लागले. ऐनवेळी धुळ्यातून उमेदवारी लादलेल्या काॅंग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांचा निसटता पराजय झाला.
- उत्तर महाराष्ट्रात महायुतीचा आलेख घसरला
- तीन मतदारसंघ गमावले
- मविआला तीन जागा
- केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार पराभूत
- हेमंत गोडसे, डॉ. हीना गावित यांची हॅट्ट्रिक चुकली
मोदी लाटेचा अभाव, सरकारच्या मराठा आरक्षणविरोधी भूमिकेमुळे दुरावलेला मराठा समाज, छगन भुजबळ यांना उमेदवारी नाकारत ओढावून घेतलेली ओबीसी समाजाची नाराजी, न भावलेले पक्ष फोडाफोडीचे राजकारण, उमेदवारी जाहीर करण्यात झालेला विलंब आणि गेल्या दोन पंचवार्षिकमधील अन्टी इन्कबन्सीचा फटका अखेर नाशिकमध्ये महायुतीला बसला असून, महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ(पराग) वाजे यांच्या रुपाने नाशिकमध्ये ‘मशाल’ पेटली आहे.
सलग दोनवेळा नाशिकचे खासदार राहिलेल्या महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा तब्बल 1 लाख 62 हजार 1 मतांच्या फरकाने पराभव करत वाजे ‘जायंट किलर’ठरले असून, गोडसे यांचे नाशिककमधून ‘हॅटट्रीक’ साधण्याचे स्वप्न अखेर भंगले आहे. नाशिकमधून विजयाचा दावा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे करण गायकर यांना तिसऱ्या तर अपक्ष शांतिगिरी महाराज यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. गायकर, शांतिगिरी महाराज यांच्यासह नाशिकच्या निवडणूक रिंगणातील ३१ पैकी तब्बल २९ उमेदवारांना अनामत रक्कमही वाचवता आलेली नाही.
नाशिकची निवडणूक लक्षवेधी ठरली
नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणूक यंदा कमालीची चुरशीची ठरली. वरकरणी ही निवडणूक महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन गटामधील एकमेकांविरोधातील वर्चस्वाची लढाईच होती. त्यामुळेच शिवसेना दुभंगल्यानंतर ठाकरे गटासाठी नाशिकची निवडणूक जशी अस्तित्वाची होती तशीच ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची देखील होती. ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे तर, शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली गेली होती. परंतु,अपक्ष उमेदवार शांतिगीरी महाराज यांच्या एंट्रीमुळे नाशिकची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यातच वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी करण गायकर यांना रिंगणात उतरल्याने नाशिकमध्ये प्रथमच मराठा विरुद्ध मराठा अशी लढाई रंगली. गेल्या २० मे रोजी मतदान झाले होते. या निवडणूकीसाठी गेल्या ५७ वर्षांच्या नाशिकच्या इतिहासात प्रथमच ६०.७५ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे नाशिकमधून कोणाला संधी मिळणार याचीच चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होती. अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ८ वाजेपासून पोलिस बंदोबस्तात मतमोजणीला सुरूवात झाली.
पहिल्या फेरीपासूनच राजाभाऊ वाजेंनी घेतली आघाडी
पहिल्या फेरीपासूनच वाजे यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. सकाळी ९ वाजता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला. पहिल्या फेरीत गोडसे यांना १९,३५४ तर वाजे यांना ३०,१०६ मतं मिळाली. वाजे यांनी पहिल्या फेरीतच तब्बल १०,७५२ मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत १९५४३, तिसऱ्या फेरीत ३०,५९९, चौथ्या फेऱीत ३६,४३८ तर पाचव्या फेरीत ४४,५१२ मतांची आघाडी घेतल्यानंतर वाजे यांच्या विजयाची चाहुल साऱ्यांनाच लागली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोम संचारला तर महायुतीच्या कार्यकर्त्यांचे चेहरे पडले. सहाव्या फेरीत ५१,००५ तर अकराव्या फेरीत १ लाख ३ हजार३९१ मतांची घसघशीत आघाडी घेत वाजे यांनी विजय पथावर वाटचाल सुरू ठेवली. पंधराव्या फेरीअखेर वाजे यांना मिळालेली १ लाख २९ हजार ७५ मतांची आघाडी गोडसे समर्थकांना पराभवाचे दर्शन घडविणारी ठरली. २० वा फेरीअखेर वाजे यांनी ५ लाख ४५ हजार ७०० मतांचा पल्ला गाठत १ लाख ५२ हजार १५९ मतांची निर्णायक आघाडी घेतली. या फेरीअखेर गोडसेंच्या पदरात ३ लाख ९३ हजार ५४१ मतं मिळू शकली. २५व्या फेरीअखेर वाजे यांनी १ लाख ६४ हजार ५ तर ३० व्या फेरीअखेर १ लाख ६१ हजार १०३ मतांची आघाडी घेत विजयावर मोहोर उमटवली. या निवडणुकीत टपाली मतदानासह वाजे यांनी सर्वाधिक 6 लाख 16 हजार 729 मतं मिळवत विजयश्री संपादन केली. गेल्या २०१४ आणि २०१९ या सलग दोन पंचवार्षिक निवडणुका जिंकत छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव करणाऱ्या गोडसे यांचा या निवडणुकीत मात्र नवख्या वाजे यांनी 1 लाख 62 हजार 1 मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीच्या माध्यमातून हॅटट्रीक साधत केंद्रीय मंत्रीपदापर्यंत झेप घेण्याचे गोडसे यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.
केंद्रीय मंत्रीपदाचे गोडसेंचे स्वप्न भंगले
२०१४ च्या निवडणूकीत मंत्री छगन भुजबळ यांचा पावणेदोन लाख मतांनी पराभव करत हेमंत गोडसे जायंट किलर ठरले होते. त्यानंतर २०१९ मध्ये गोडसेंनी माजी खासदार समीर भुजबळ यांचा पावणे तीन लाखांनी पराभव केला होता. या दोन विजयामुळे गोडसेंनी ४८ वर्षापूर्वीच्या स्व. भानुदास कवडे यांच्या सलग दोनवेळा नाशिकचा खासदार होण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती केली होती. यंदा तिसऱ्यांदा उमेदवारी करून गोडसे हॅटट्रीकच्या तयारीत होते. परंतु, ठाकरे गटाच्या राजाभाऊ वाजेंनी गोडसेंच्या विजयाचा वारू रोखला. त्यामुळे तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्याचे केंद्रीय मंत्रीपद मिळविण्याचे गोडसेंचे स्वप्न अखेर भंगले आहे.
शांतिगिरी महाराजांचा चमत्कार नाहीच
विजयाचा दावा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांना २०२९ मधील वंचितचे उमेदवार पवन पवार यांना मिळालेल्या मतांच्या निम्मी मतं देखील मिळवता आली नाही. गायकर यांना 47,193 मतं मिळवत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महायुतीने उमेदवारी न दिल्याने अपक्ष निवडणूक रिंगणात उतरत आव्हान उभे करणाऱ्या शांतिगिरी महाराजांचा चमत्कार या निवडणुकीत दिसून आला नाही. त्यांना चौथ्या क्रमांकाची 44,524 मतं मिळू शकली.
सिन्नर, इगतपुरी वाजेंच्या विजयाचे शिल्पकार
वाजे हे सिन्नरचे भूमिपूत्र असल्यामुळे त्यांना सिन्नरमधून मतांची मोठी आघाडी मिळेल, हे सर्वश्रृत होते. त्यानुसार सिन्नरकरांनी वाजे यांच्या झोळीत भरभरून मतांचा जोगवा टाकला. मात्र सिन्नरबरोबरच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातूनही वाजे यांना मतांची मोठी आघाडी मिळाली. सिन्नरमधील मतांची वाजेंची आघाडी फोडण्यासाठी गोडसे यांना नाशिकमध्य, देवळाली, इगतपुरी आणि नाशिक पश्चिम मधून मोठी आघाडी मिळण्याची अपेक्षा होती. परंतू नाशिकमध्य, देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघानेही वाजे यांनाच पसंती दिली. नाशिक पश्चिम व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील अल्प आघाडी वगळता गोडसे पिछाडीवरच राहिले.
उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी…
राजाभाऊ(पराग) प्रकाश वाजे- (विजयी) 6,16,729, हेमंत तुकाराम गोडसे (पराभूत) 4,54,728, करण पंढरीनाथ गायकर 47,193, शांतिगिरी मौनगिरीजी महाराज 44,524, अरुण मधुकर काळे 7,751, अमोल संपतराव कांबळे 4,997, कमलाकर बाळासाहेब गायकवाड- 1,646, कांतिलाल किसन जाधव- 2055, कैलास मारूती चव्हाण- 1703, जयश्री महेंद्र पाटील 2426, अॅड. झुंजार म्हसुजी आव्हाड- 1210, दर्शना अमोल मेढे- 4736, भाग्यश्री नितीन अडसुळ- 1244, यशवंत बाळू पारधी- 1874, वामन महादेव सांगळे- 3861, आरिफ उस्मान मन्सुरी- 2543, कनोजे प्रकाश गिरधारी- 3920, कोळप्पा हनुमंत धोत्रे- 1200, गणेश बाळासाहेब बोरस्ते- 2404, चंद्रकांत केशवराव ठाकूर- 6608, चंद्रभान आबाजी पुरकर- 1890, जितेंद्र नरेश भाभे-3132, तिलोत्तमा सुनील जगताप- 656, दिपक गायकवाड-642, देविदास पिराजी सरकटे- 394, धनाजी अशोक टोपले-1376, सचिनराजे दत्तात्रेय देवरे- 551, सिध्देश्वरानंद सरस्वती- 2388, सुधीर श्रीधर देशमुख-3167, सुषमा अभिजित गौराणे-2260, सोपान सोमवंशी- 1211, नोटा- 6185
माझ्या विजयाचे संपूर्ण श्रेय हे नाशिककर जनता आणि महाविकास आघाडीच्या नेते आणि
कार्यकर्त्यांना आहे. असली-नकली शिवसेना कोण या फैसला नाशिककर जनतेने या निवडणुकीतून दिला आहे. माझा विजय निश्चित होता. विजयाची खात्री होती. नाशिककरांच्या मदतीने आज मोठी लढाई जिंकली आहे. आता माझ्यावरील जबाबदारी देखील वाढली आहे. माझ्या विजयासाठी सिन्नरच्या जनतेने संपूर्ण मतदारसंघात प्रचार करून मला विजयापर्यंत पोहोचविले. आजचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर उद्यापासून मी नाशिककरांच्या सेवेसाठी हजर राहणार आहे. – राजाभाऊ वाजे, विजयी उमेदवार, शिवसेना ठाकरे गट, नाशिक.
हेही वाचा: