नाशिक : पुढारी वृत्तसेवा – शहरामध्ये ‘डेंग्यू’चा ज्वर कायम असून गेल्या आठवडाभरातच या आजाराचे १४ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १०३ वर पोहोचली आहे. मे महिन्यातच सर्वाधिक ३३ नवे डेंग्यू रुग्ण आढळल्याने महापालिकेचा वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे.
नाशिकमध्ये गतवर्षी तब्बल ११९१ डेंग्यूबाधित आढळून आले होते. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव भीतीदायक ठरला होता. डिसेंबर २०२३मध्ये या आजाराने तीन जणांचा बळी घेतला होता. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेच्या मलेरिया विभागाने तातडीने उपाययोजना करत धूरफवारणी, जंतूनाशक फवारणी सुरू केल्याने नववर्षाच्या प्रारंभी या आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. ‘एडीस एजिप्ती’ या जातीचा डास चावल्यानंतर डेंग्यूची लागण होते. या प्रजातीच्या डासांची पैदास पाच ते सात दिवसांपेक्षा अधिककाळ साचलेल्या स्वच्छ पाण्यातच होते. वाढत्या उन्हामुळे यंदा कुलर, एसीचा वापर वाढला आहे. कुलरमध्ये पाणी साचून राहत असल्यामुळे डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे उन्हाचा कडाका कायम असूनही शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवडाभरातच डेंग्यूचे १४ नवे रुग्ण आढळल्याने जानेवारी ते ३० मे २०२४ या कालावधीतील डेंग्यू रुग्णसंख्येचा आकडा १०३वर पोहोचला आहे.
७५० घरांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती
दरम्यान, डेंग्यूची वाढती रुग्णसंख्या वैद्यकीय विभागाची चिंता वाढविणारी ठरली आहे. डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी वैद्यकीय विभागांतर्गत मलेरिया पथकांमार्फत घरोघरी भेटी देऊन पाणीसाठ्यांची तपासणी केली जात आहे. गेल्या महिनाभरात तब्बल एक लाख ५७ हजार ५४४ घरांना भेटी देण्यात आल्या असून, त्यातील एक लाख ९३ हजार ३०९ साठ्यांची तपासणी करण्यात आली. यात ७५० घरांमधील ८६० पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यूच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या ‘एडिस एजिप्ती’ प्रजातीच्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. ५४६ पाणीसाठे रिकामे करण्यात आलेत. ३१४ पाणीसाठ्यांमध्ये अॅबेट प्रक्रिया करण्यात आली असून ९३१ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. डेंग्यू डासांच्या उत्पत्तीस कारणीभूत ठरणाऱ्या ८३ नागरिकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
डेंग्यूचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागला आहे. कुलर्स, पाण्याच्या टाक्या, फुलदाण्यांमध्ये साचलेल्या पाण्यात डेंग्यू डासांची उत्पत्ती होत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी. लक्षणे आढळताच रुग्णालयात उपचार घ्यावेत. – डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख, मनपा.
हेही वाचा: