नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा?

Sanjay Raut

खा. राऊत यांची भूसंपादन घोटाळ्याबाबत ‘एक्स’ पोस्ट चर्चेत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा झाल्याची ‘एक्स’ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. ‘राज्याच्या नगरविकास खात्याने नाशिकमध्ये तब्बल ८०० कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा केला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मी या घोटाळ्याचे पुरावे सादर करून मोठा स्फोट करेन,’ असे खा. राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज्याचे नगरविकास खाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने राऊत यांनी या पोस्टद्वारे थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

या पोस्टमध्ये राऊत यांनी म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात भ्रष्ट्राचार हाच शिष्टाचार ठरत आहे. सध्याचे महाराष्ट्रातील मिंधे सरकार हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. नगरविकास खात्याने नाशिक महापालिका हद्दीत ८०० कोटीचा भूसंपादन घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक या गैरव्यवहारातले थेट लाभार्थी आहेत. मी दोन दिवसांत यावर स्फोट करेन. तोपर्यंत लाभार्थ्यांनी शांत झोपावे’, असा इशारादेखील राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्र कोण लुटत आहे? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे.

राऊत यांनी एका बाजूला मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेले असतानाच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट या घराजवळ झालेल्या गोळीबाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलेल्या आरोपींपैकी एक अनुज थापन याने बुधवारी (१ मे) पोलिस कोठडीत आत्महत्या केली आहे. या आत्महत्येच्या घटनेवरून राऊत यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. राऊत म्हणाले, या प्रकरणात अनेक रहस्य आहेत. पोलिस कोठडीत एखाद्या संशयित आरोपीचा मृत्यू झाला आहे, याचा अर्थ या घटनेला महाराष्ट्राचं गृहमंत्रालय, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबईचे पोलिस आयुक्त या घटनेला जबाबदार आहेत. या आत्महत्याप्रकरणी अधिक तपास करण्याची गरज आहे. आम्ही तशी मागणी करतो. मात्र, ही मागणी करून काहीच होणार नाही. कारण त्यासाठी सरकार बदलणे आवश्यक आहे. सरकार बदलले तर अशा प्रकरणांचा तपास होईल. अन्यथा हे लोक हे प्रकरण दाबतील, असे नमूद करत फडणवीस व पोलिस यंत्रणेवर राऊत यांनी संशय व्यक्त केला आहे.

The post नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा? appeared first on पुढारी.