नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देणारा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसांनी १६ लाख ५० हजार किमतीचे २८६ ग्रॅम म्हणजेच २८.६ तोळे चोरीचे सोने हस्तगत केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकूण चोरीच्या सात गुन्हातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८ ,राहणार कैलासजी सोसायटी ,जेलरोड) असे संशयीत गुन्हेगाराचे नाव आहे. संशयिताने सुरुवातीला तीन गुन्ह्यांची कबुली दिली. मात्र पोलीस खाक्या खाक्या दाखवताच उर्वरित चार गुन्ह्यांची कबुली त्याने दिली. संशयित आरोपी विशाल गांगुर्डे याने चोरीचे सोने विक्री केलेले प्रशांत विष्णूपंत नागरे (वय ४३ ,व्यवसाय सराफी दुकान ,राहणार गुरुकृपा हाऊसिंग सोसायटी कॅनल रोड) , हर्षल चंद्रकांत म्हसे (वय ४२ , व्यवसाय सराफी दुकान , राहणार सिल्वर नेस्ट अपार्टमेंट विजय नगर जय भवानी रोड नाशिक रोड) आणि चेतन मधुकर चव्हाण (वय ३० , व्यवसाय सराफी दुकान , राहणार महात्मा फुले चौक जवळ जिल्हा पालघर) यांना देखील पोलिसांनी याप्रकरणी अटक करण्यात केली आहे. उघडकीस आलेल्या गुन्ह्यापैकी नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील सहा तर उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील एका गुन्ह्याचा यामध्ये समावेश आहे. शकुंतला दादा जगताप (वय ७५ ,राहणार सामनगाव) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तपास सुरू असताना संशयित आरोपी गांगुर्डे यास पोलिसांनी अटक केली होती. यावेळी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पोलिसांनी केलेल्या तपासाविषयी माहिती दिली.डॉ. सचिन बारी मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पवन चौधरी पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश शेळके, पोलीस हवालदार विजय टेमगर, पोलीस हवालदार विष्णु गोसावी, पोलीस शिपाई सागर आडणे, गोकुळ कासार, रोहित शिंदे, अरूण गाडेकर,  मनोहर कोळी,  बाना पानसरे, यशराज पोत, संतोष पिंगळ, भाऊसाहेब नागरे, कल्पेश जाधव, कोकाटे, सचिन वाळूज यांच्या समुहाने ही यशस्वी कामगिरी बजावली.

हेही वाचा:

The post नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त appeared first on पुढारी.