नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड

अपघातग्रस्त कारमध्ये नोटांचे घबाड,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथून उंटवाडीकडे जात असताना मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या कारचालकाच्या अपघातग्रस्त कारमध्ये चक्क पाचशे व दोन हजारांच्या नोटांनी खचाखच भरलेल्या दोन बॅगा सापडल्याने तोबा गर्दी झाली…परंतु या नोटा लहान मुलांच्या खेळण्यांमधील असल्याने गर्दी करणाऱ्यांचा चक्क हिरमोड झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मद्यधुंद कारचालक चंद्रकांत दाहिजे (वय ३४, रा. मिलिंदनगर, नाशिक) बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्रिमूर्ती चौकातून उंटवाडीच्या दिशेने स्विफ्टने (एमएच ०१ एई ९८१०) जात होता. मद्यधुंद अवस्थेमुळे कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने तीन-चार वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जोरदार आवाजामुळे नागरिकांची गर्दी जमली. नागरिकांनी वाहनात बघितले असता चक्क दोन बॅगा भरलेल्या पाचशे व दोन हजारांच्या नोटा आढळल्याने क्षणात गर्दी आणखी वाढली. या घटनेची माहिती कळताच तत्काळ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आणि कडक बंदोबस्तात सदर वाहन अंबड पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

पोलिसांनी या नोटांची तपासणी केली असता त्या लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या नोटा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दाहिजेविरोधात ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह व अपघाताचा गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याला गुरुवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

हेही वाचा :

The post नाशिक : अपघातग्रस्त कारमध्ये सापडले नोटांचे घबाड appeared first on पुढारी.