नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या दोन वर्षांच्या निर्बंधांनंतर पर्यटनस्थळे सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली होती. वीकेण्डला पर्यटनस्थळी होणारी गर्दी तसेच मद्यपी आणि हुल्लडबाजामुळे वनविभागाने बंदी आणली होती. पर्यटनबंदी उठविण्याच्या मागणीनंतर शनिवार (दि. 23)पासून निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले होते. परिणामी, रविवारी (दि. 24) पर्यटनस्थळांवर गर्दी झाली होती.
पावसाळा सुरू झाल्यानंतर पर्यटक मोठ्या संख्येने त्र्यंबकेश्वर-इगतपुरी तालुक्यात वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी येतात. किल्ले, धरण व धबधबा येथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी असल्याने दुर्घटनेची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वनविभागाने पर्यटनस्थळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पर्यटनबंदीमुळे पश्चिम पट्ट्यातील आदिवासींचा रोजगार हिरावला गेला होता. पर्यटन आणि वनविभागाच्या बैठकीत स्थानिक अर्थचक्राला गती देण्यासाठी बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पर्यटनबंदी मागे घेण्यात आल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा, पेगलवाडी, पहिने, अंबोली आदी परिसरात पर्यटन पुन्हा बहरल्याचे चित्र होते. शहरालगतचा सोमेश्वर धबधबा, गंगापूर तसेच कश्यपी धरण, दरी-मातोरी परिसरातही पर्यटकांनी हजेरी लावली होती. पर्यटनस्थळाकडे जाणार्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.
पर्यायी पर्यटनस्थळांनाही पसंती :
पोलिसांसह वनविभागाचा ससेमिरा चुकविण्यासाठी अनेकांनी इतर पर्यायी पर्यटनस्थळांकडे धाव घेतली होती. विशेषत: आदिवासी भागातील डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, गर्द हिरवाईने नटलेला परिसर व अधूनमधून कोसळणारा पाऊस पर्यटकांना मोहिनी घालत आहे.
हेही वाचा :
- इस्लामपूर : जयंत पाटील यांनी 110 कोटींचा निधी दिला
- कोल्हापूर : थंडी, तापाने रुग्ण बेजार
- गोवा : जखमा कशा दुर्दैवी झाल्यात काळजाला; सरकारकडून तुटपुंजी मदत
The post नाशिक : जिल्ह्यातील निर्बंध हटताच पर्यटनस्थळांवर गर्दी appeared first on पुढारी.