नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम उत्पादने सर्वाधिक अमेरिकेमध्ये

Nashik www.pudhari.news

नाशिक : सतीश डोंगरे

देशात निर्यातीत गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातून जगभरात विविध उत्पादनांची निर्यात केली जाते. देशाच्या एकुण निर्यातीत १७.३३ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील विविध उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविली जातात. नाशिक जिल्ह्यातील निर्यातक्षम उत्पादने सर्वाधिक अमेरिकेत निर्यात केली जात असल्याची आकडेवारी समोर येत आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातून अमेरिकेत तब्बल चार हजार १७४ कोटींची निर्यात केली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात त्यात आणखी भर पडली आहे.

केंद्रीय उद्योग मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या वाणिज्य शोध व सांख्यिकी महासंचालनालयाच्या आकडेवारीवरून नाशिक जिल्ह्यातून होणारी निर्यात समाधानकारक आहे. नाशिक जिल्हा प्रामुख्याने द्राक्ष आणि पैठणीच्या निर्यातीसाठी ओळखला जातो. २०२३-२४ या वर्षात नाशिकमधून सुमारे १.५७ लाख टन द्राक्षांची निर्यात केली गेली. याव्यतिरिक्त देखील नाशिकमधून निर्यात होणाऱ्या उत्पादनांची यादी मोठी असून, यातील बहुतांशी अन् सर्वाधिक उत्पादने अमेरिकेत निर्यात केली आहेत. जिल्ह्यातून सर्वाधिक चार हजार १७४ कोटी रुपयांची निर्यात अमेरिकेत केली असून, त्यात औषधे, वाहनांचे सुटे भाग, बेअरिंग, तेल व गॅससाठीचे लोखंडी पाइप, एसी जनरेटर्स आदी उत्पदनांचा समावेश आहे. अमेरिकेपाठाेपाठ दुसऱ्या क्रमांकावर संयुक्त अरब अमिरात येथे तब्बल दोन हजार ७२९ कोटींची निर्यात करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कांदा, ऊस, द्राक्षे, व्हिस्की, बोर्ड, पॅनल्स, हिरवी मिरची, स्मार्टफोन, दोरखंड या उत्पादनांचा समावेश आहे. तसेच बांगलादेश, मलेशिया, जर्मनी, नेदरलॅण्ड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंग्लंड, सौदी अरेबिया या देशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या उत्पादनांची निर्यात करण्यात आली आहे.

नाशिकचा वाटा २३ हजार ८४३ कोटींचा
दरम्यान, निर्यातीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातून २०२२-२३ या वर्षात पाच लाख ८१ हजार ४३९ कोटींची निर्यात करण्यात आली आहे. ऑक्टोंबर २०२२ पर्यंत हे प्रमाण ५६.९० अब्ज डॉलर्स इतके होते. त्यात वर्षभरात ९.४३ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले असून, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ही वाढ १० टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या एकुण निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा २३ हजार ८४३ कोटींचा आहे.

जिल्ह्यातून या उत्पादनांची निर्यात
अमेरिका : औषधे, वाहनांचे सुटे भाग, लोखंडी पाइप आदी.
यूएई, बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका : कांदा, ऊस, गहू, द्राक्षे, व्हिस्की, हिरवी मिरची.
जर्मनी, नेदरलॅण्ड, दक्षिण आफ्रिका : कॅपेसिटर्स, फ्युअल इंजेक्शन, बॉल बेअरिंग, औषधे.
इंग्लंड : मका, सोयाबीन, मोटारकार सिलिंडर, पॉलिमर.

देशनिहाय निर्यात
अमेरिका : चार हजार १७४
यूएई : दोन हजार ७२९
बांगलादेश : एक हजार ७४४
मलेशिया : एक हजार ६०४
जर्मनी : एक हजार ५४८
नेदरलॅण्ड : एक हजार ४४९
दक्षिण आफ्रिका : एक हजार ३८४
श्रीलंका : ८९८
इंग्लंड : ८१२
सौदी अरेबिया : ७६२

नाशिकमधून विविध उत्पादनांची निर्यात केली जात असली तरी, आपल्याकडील टेक्नॉलॉजी प्रोडक्टला इतर देशांमध्ये नो एंट्री आहे. अमेरिका आणि यूरोपमध्ये टेक्नॉलॉजी आणि फार्मास्युटीकल प्रोडक्ट घेतले जात नाहीत. त्यामुळे या उत्पादनांची निर्यात करण्यासाठी शासन स्तरावर सहाय्यभूत असे धोरण निश्चित करायला हवे. निर्यातीवर सबसिडी लागू करायला हवे. जेणेकरून देशातील निर्यात वाढीला चालना मिळेल. – जयप्रकाश जोशी, व्यवस्थापकीय संचालक, जोटो अ‍ॅब्रेसिव्हज् प्रा. लि.

हेही वाचा: