Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कसारा घाटात गायींना घेऊन जाणारा टेम्पो अडवून कत्तलीसाठी नेत असलेल्या जनावरांची सुटका करताना जमावाच्या बेदम मारहाणीत दोघांच्या मृत्यूनंतर फरार असलेल्या चौघा संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटक केली. ( Nashik News )

८ जून कसारा घाटात मॉब लिंचिंगचा हा भीषण प्रकार घडला होता. या गुन्ह्यात फरार असलेले सूरज रामप्रताप परदेशी (वय २५), गणेश चंद्रकांत राऊत (वय २३), विकास शर्मा, धनराज परदेशी या इगतपुरीतील चौघांना इगतपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांनी अटक केली. चौघांना सोमवारी (दि. १६) इगतपुरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणी पूर्वी सहा संशयितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. (Nashik News)

शहापूर तालुक्यातील विहितगाव येथून आठ जूनला पडघा येथील पप्पू अतीक पड्डी (वय ३६) अकील गुलाम गवंडी (वय २५) आणि लुकमान सुलेमान अंसारी (वय २५) हे तिघे रात्री टेम्पोतून दोन गायी, बैल, वासरू हे पडघा (जि. ठाणे) येथे घेऊन मुंबईकडे चालले होते. कारेगाव येथून पिकअपमध्ये गोवंश जनावरे घेऊन प्रल्हाद शंकर पगारे (रा. विहितगाव) याच्या घरासमोर रात्री थांबलेले होते. यावेळी कारेगावकडून झायलो, स्विफ्ट कार आणि ७ ते ८ मोटरसायकली घेऊन १५ ते २० जणांच्या टोळक्याने टेम्पो अडवला आणि तिघांना बेदम मारहाण केली. तिघांपैकी अकील गवंडी हा पळून गेल्याने बचावला. उरलेल्या दोघांना टेम्पोसह टोळक्याने कसारा घाटातील घाटनदेवी मंदिरासमोर आणून रात्री दोनच्या सुमारास पुन्हा बेदम मारहाण केली. यावेळी लुकमान अंसारी हा जीव वाचवण्यासाठी घाटनदेवी मंदिरासमोरील उंटदरीच्या दिशेने पळताना दरीत पडून ठार झाला. टोळक्याने टेम्पो व जखमी अतिक हर्षद पड्डी याला इगतपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी गंभीर जखमी चालकास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु तो दगावला. दुसऱ्या दिवशी लुकमान गायब असल्याची तक्रार इगतपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली. १० जूनला त्याचा मृतदेह २५० फूट खोल दरीत आढळला होता. मॉब लिंचिंग सदोष प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना आधीच अटक केलेली आहे.

हेही वाचा :

The post Nashik News : कसारा घाटातील मॉब लिंचिंगमधील चौघे फरार अखेर जेरबंद appeared first on पुढारी.