नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघांसाठी शनिवारी (दि.१८) सायंकाळी ६ वाजता प्रचार संपुष्टात येणार आहे. प्रचारासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात अधिकधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची धावपळ सुरू आहे.
देशाचे भवितव्य ठरविणाऱ्या १८ व्या लोकसभेसाठी सोमवारी (दि.20) पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील अंतिम १३ जागांसाठी याच दिवशी मतदान होणार असून, त्यामध्ये जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार रिंगणात आहेत. तर दिंडाेरीत १० उमेदवार नशीब आजमावत आहे. असे असले तरी खरी लढत ही महायुती विरुद्ध महाआघाडी अशीच असणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन आठवड्यांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्र व राज्यातील प्रमुख मंत्री तसेच विविध पक्षांचे नेते नाशिकमध्ये ठाण मांडून होते. यावेळी संबंधित नेत्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार रॅली, सभा, रोड शो, कॉर्नर सभा तसेच वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या. या दरम्यान, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले. त्यामुळे राजकीय वातावरण तापून निघाले. तर सामान्य मतदारांचे चांगलेच राजकीय मनाेरंजन झाले.
नाशिक व दिंडोरी मतदारसंघामधील प्रचाराच्या तोफा शनिवारी (दि.१८) थंडावणार आहेत. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात उमेदवारांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. शहरी भागात विविध प्रभाग, तर ग्रामीण भागात प्रत्येक गावापर्यंत राजकीय नेते व पदाधिकारी तसेच उमेदवारांचे समर्थक पोहोचत आहेत. आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी हे सर्वजण मतदारांना आर्जव करत आहेत.
आता रात्र वैऱ्याची
लोकसभा निवडणुकीत खुला प्रचार संपुष्टात येणार आहे. शनिवारी (दि.१८) सायंकाळी ६ नंतर ते मतदानाच्या दिवसापर्यंत (दि.२०) कालावधी अधिक महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे पुढील दोन रात्र वैऱ्याची असल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून छुप्या प्रचारावर भर देण्यात येणार आहे. या काळात मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी घेत मतदानासाठीचे दान मागितले जाईल.
हेही वाचा –