नाशिक : पुढारी वृत्तसेवा
संरक्षण क्षेत्रात लागणाऱ्या विविध उत्पादनांसाठी वेंडर डेव्हलपमेंट व नवीन संशोधनाला मदत व्हावी यादृष्टीने तसेच आत्मनिर्भर भारत या अभियानात भाग घेण्यासाठी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या १६ कंपन्या तसेच तिन्ही सैन्यदल विभागांसाठी आवश्यक ती क्षमता नाशिकसह महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमध्ये आहे काय? याबाबतची खात्री केली जाणार आहे.
डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट येथे नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटरतर्फे आयोजित कार्यक्रमात ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राइव्ह’ची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संरक्षण मंत्रालयाचे आयडेएक्स विभागाचे प्रोग्राम संचालक डॉ. वी. के. राय, एचएएलचे उपमहाव्यवस्थापक डॉ. अजित भांदक्कर यांंच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. राय यांनी, सरकारच्या संरक्षण मंत्रालय सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी नीती आयोगाच्यावतीने स्टार्टअप तसेच लघुउद्योजकांमधील संशोधनासाठी स्वदेशीकरणासाठी व संशोधन सिद्ध झाल्यानंतर उत्पादन सुरू करेपर्यंत विविध योजना, दहा लाखांपासून ते दहा कोटीपर्यंतच्या अनुदान तसेच कर्जाच्या विविध योजनांची माहिती दिली. डॉ. भांदक्कर यांनी, एचएएलची आवश्यकता असलेल्या उत्पादनांची यादी व स्वदेशीकरणासाठी भागीदार निवडण्याची कार्यप्रणाली सांगितली.
प्रास्ताविक संचालक डॉ. प्रशांत पाटील यांनी केले. डिफेन्स इनोव्हेंशन सेंटरच्या कार्यप्रणालीची माहिती संचालक युवराज वडजे यांनी प्रेझेंटेशनद्वारे उपस्थितांना सांगितली. नाशिक डिफेन्स इनोव्हेशन सेंटरचे संचालक प्रदीप पेशकार यांनी, ‘एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राइव्हची संकल्पना स्पष्ट केली. तसेच कंपन्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या विविध कंपन्यांसमोर कशाप्रकारे प्रेझेंटेशन करावे याबाबतची माहिती दिली.
कार्यक्रमासाठी डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट व हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव आनंद देशपांडे, प्राचार्या डॉ. प्रीती कुलकर्णी, निशिकांत अहिरे, निखिल तापडिया, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, आनंदराव सूर्यवंशी, नारायणराव क्षीरसागर, सचिन तरटे, सुहास कुलकर्णी आदी उपस्थित होते.
३०० कंपन्यांचा सहभाग
या अभियानात नाशिकसह महाराष्ट्रातील सुमारे तीनशे विविध प्रकारच्या कंपन्या सहभागी होणार आहेत. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या कंपन्यांचे अधिकारी या कंपन्यांची क्षमता पाहून त्यांच्याबरोबर विविध उत्पादनांसाठी करार करतील. संरक्षण मंत्रालयाच्या व एमएसएमई मंत्रालयाच्या सूचनेनुसार सर्व ग्राहक या ड्राइव्हमध्ये भाग घेऊन क्षमता असलेल्या कंपन्यांना निवडतील. अशाप्रकारचा उपक्रम प्रथमच केला जात असल्याने त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. व्ही. के. राय यांनी केले.
The post नाशिक डिफेन्स इनोशव्हेन सेंटर; 'एमएसएमई कॅपॅबिलिटी असेसमेंट ड्राईव्ह'ची केली घोषणा appeared first on पुढारी.