मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कधीकाळी बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये गतवैभव प्राप्त करण्यासाठी मनसेच्या वाटेत सर्वात मोठा अडथळा स्थानिक पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत कलहाचा ठरत आहे. हा कलह पक्षप्रमुखांच्या कानी वेळोवेळी पडला आहे. त्यांनी आपल्या शैलीत कान टोचण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध थांबता थांबत नसल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्त्वपूर्ण ठरणार असून, मिशन लोकसभेचा नारा देण्याअगोदर त्यांना पदाधिकाऱ्यांमधील वादावर पडदा टाकण्याचे मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे.

महानगरपालिकेत सत्ता, शहरात पक्षाचे तीन आमदार असे वैभव असलेल्या मनसेला पदाधिकाऱ्यांमधील टोकाच्या मतभेदामुळेच घरघर लागली. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपसह अन्य पक्षांचे पर्याय निवडले. परिणामी गेल्या महापालिका निवडणूकीत बोटावर मोजता येतील इतकेच पक्षाचे नगरसेवक निवडून आले. महापालिकेतील सत्ता गेल्याचे शल्य राज यांना कायम असल्याने, त्यांनी संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. शहर व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदांमध्ये खांदेपालट केली. दिलीप दातीर यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली. मात्र, अचानकच त्यांनी पदाला न्याय देवू शकत नसल्याचे सांगत पदमुक्त करण्याची विनवणी पक्षप्रमुखांकडे केली. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, त्यांच्या राजीनामा नाट्यास अंतर्गत कलहाचे कंगोरे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. पुढे ही जबाबदारी सुदाम कोंबडे यांना देण्यात आली. सोबतच अमित ठाकरे यांना पदाधिकाऱ्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे आदेश दिले. अमित ठाकरेंनी वेळोवेळी दौरे करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये हुरुप निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. मात्र, पदाधिकाऱ्यांमधील ‘कोल्डवॉर’ मिटता मिटत नसल्याने मनसेचा मिशन लोकसभेचा मार्ग खडतर असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, गुरुवारी (दि.१) राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबिरात ते आगामी लोकसभेचा अन् पक्षीय मोटबांधणीचा आढावा घेणार आहेत. मात्र, तत्पूर्वी त्यांना पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या ‘कोल्डवॉर’ चा सर्वप्रथम आढावा घेणे आवश्यक असणार आहे. मनसेतील काही पदाधिकाऱ्यांच्या मते, पक्षवाढीसाठी कसोशीने प्रयत्न करून देखील ठराविक मंडळींनाच पुढे करण्याचे काम केले जाते. जे लोक पक्षाच्या उपक्रमात कधीही सहभागी होत नाहीत, पक्षप्रमुखांच्या दौऱ्यात मात्र ते सर्वात पुढे असतात. सर्वांना समान न्याय या तत्त्वानुसार जबाबदाऱ्या सोपविल्यास पक्षात चैतन्य निर्माण होवू शकेल. दरम्यान, पदाधिकाऱ्यांच्या या भावना लक्षात घेवून पक्षप्रमुख राज ठाकरे लोकसभेचा बिगुल फुंकणार काय? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

बड्या पक्षांना मनसेचा झटका
गेल्या काही दिवसांपासून मनसेत ‘आऊटगोईंग’ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, आता मनसेत इनकमिंगचे वारे वाहू लागले आहेत. आगामी निवडणूका लक्षात घेता बड्या पक्षातील काही स्थानिक नेते मनसेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतर पक्षांना तो झटका असला तरी, मनसेसाठी हा सुखद दिलासा ठरण्याची शक्यता आहे.

The post मनसेप्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांमधील शीतयुद्ध रोखण्याची कार्यकर्त्यांना अपेक्षा appeared first on पुढारी.