नाशिक : …तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा

जन आंदोलन इशारा,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

प्रभाग क्रमांक २४ मध्ये ठिकठिकाणी पावसाळी आणि ड्रेनेज लाइनचे चेंबर जमिनीत बुजले गेले आहेत, काही रस्त्याच्या वर आले आहेत, तुटले आहेत. ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत. ज्या भागात पावसाळी गटारीची लाइन नाही, तेथे पाणी तुंबणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यास या पाण्यातच जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी, २५ मे रोजी महापालिका शहर अभियंता नितीन वंजारी यांना देण्यात आले आहे.

या प्रभागातील कालिका पार्क, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिकानगर, गोविंदनगर, सदाशिनगर, बडदेनगर, मंगलमूर्तीनगर, बाजीरावनगर येथे कॉलनी रस्त्यांलगत पावसाळी गटारीची लाइन टाकण्यात आलेली नाही. तेथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचते. नागरिकांना घराबाहेर पडणे मुश्कील होते. हे पाणी तुंबणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच अस्तित्वात असलेल्या पावसाळी आणि ड्रेनेज लाइनचे चेंबर हे बर्‍याच ठिकाणी जमिनीत बुजले गेले आहेत, काही जमिनीच्या खूप वर आले आहेत, काही तुटले आहेत. पावसाळ्यापूर्वी त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयूर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, रवींद्र सोनजे, वंदना पाटील, भारती देशमुख आदींसह रहिवाशांनी केली आहे.

सिटी सेंटर सिग्नलवरील चेंबरचा धोका

गोविंदनगरकडून सिटी सेंटर मॉलकडे जाताना सिग्नलवरील चेंबरवरील ढापा पंधरा दिवसांत तीनवेळा तुटला, दोनवेळा बदलला, आज तिसर्‍यांदा तुटला. चेंबरही फुटले आहे. चेंबरची दुरुस्ती करून त्यावर मजबूत ढापा टाकणे आवश्यक आहे. तुटलेल्या चेंबरमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. अशी स्थिती राहिल्यास पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून सिग्नलवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : ...तर साचलेल्या पाण्यात जनआंदोलन; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा इशारा appeared first on पुढारी.