नाशिक : गायींना बेशुद्ध करुन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक 

गायींची तस्करी करणारे अटकेत,www.pudhari.news

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

देवळाली शहरासह भगूर परिसरातून गायींची तस्करी करणाऱ्या दोघांना पहाटे चार वाजेच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाने पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून गाडीतील विविध प्रकारचे इंजेक्शन व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

देवळाली कॅम्प भगूर परिसरात मोकाट फिरणाऱ्या गायींना  इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून त्यानंतर गाडीमध्ये टाकून त्यांची तस्करी केली जात होती. याविरोधात अनेकदा गो रक्षक संघटनानी तसेच स्थानिक युवकांनी आवाज उठवला होता.  दोन दिवसापूर्वी पोलीस स्टेशनच्या लगत देखील अशाच एका गाईला गाडीत टाकून पळून नेत असल्याचा व्हिडिओ प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.

त्यानंतर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली. त्यातच पहाटे तीन ते चार वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गीते, पोलीस हवालदार गोकुळ भगत, निलेश वराडे यांचे पथक गस्त घालत असताना स्टेशनरोड वरील ईगल कॅन्टीन जवळ  एक पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या निदर्शनास आली.  तिचा पाठलाग केला असता गाडीतील व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या.  त्यानंतर त्यांनी गाडी थांबून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये गायींना बेशुद्ध करण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे इंजेक्शन व इतर साहित्य आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गाडीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. लवकरच या टोळीचा तपास करून गायींची तस्करी रोखण्यात येईल असा विश्वास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

The post नाशिक : गायींना बेशुद्ध करुन तस्करी करणाऱ्या दोघांना अटक  appeared first on पुढारी.