नाशिक : त्र्यंबक परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव

त्र्यंबकेश्वर,www.pudhari.news

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळांवर पावसाचा जोर वाढल्याने हौशी पर्यटक दुपारी तीननंतर माघारी फिरले. स्थानिक वन व्यवस्थापन समितीने सुरक्षेच्या कारणास्तव कडक कारवाईचा इशारा दिल्याने पर्यटकांनी नमते घेतले.

ब्रह्मगिरीवर जाण्यास मज्जाव करण्यात येऊनही कोसळत्या पावसात पर्यटक आणि भाविक वर जाण्याचा प्रयत्न करत होते. अहिल्या धरण आणि परिसरात ब्रह्मगिरीचे धबधबे पाहण्यासाठी सेल्फी घेण्यासाठी पर्यटक भरपावसात उभे होते. हरिहर किल्ला, पहिणे नेकलेस धबधबा, दुगारवाडी येथे पर्यटकांना तीननंतर प्रवेश बंद करण्यात आला. ब्रह्मगिरीवर चारनंतर भाविकांना रोखण्यासाठी स्थानिक वनव्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते.

दर्शनाच्या तिकिटांचा काळाबाजार

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी आज भरपावसात रांगा लागल्या. भाविकांना दर्शनासाठी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. दर्शनबारीत हजारोंच्या संख्येत भाविक असल्याने उशिरापर्यंत दर्शन सुरू ठेवण्यात आले होते. दोनशे रुपये तिकीट काढलेले भाविक दर्शन बारीत दोन तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळत उभे होते. दोनशे रुपयांचे तिकीट बाहेर दोन हजारांना विकले जाते व काळाबाजार होतो. यासाठी सशुल्क दर्शन बंद करावे, अशी मागणी भाविक करत होते.

हेही वाचा :

The post नाशिक : त्र्यंबक परिसरात दुर्घटना टाळण्यासाठी पर्यटकांना मज्जाव appeared first on पुढारी.