नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक

अटक,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी (दि. 22) रात्री आठ वाजता झालेल्या एका युवकाच्या खून प्रकरणी उपनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधलेनगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर चार जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली होती. चौरे हा दुकानातील काम आटोपून दुचाकीने घरी जाताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चार जणांनी चौरेच्या दुचाकीला लाथ मारून चौरेला खाली पाडत टोळक्याने त्याच्यावर सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी होऊन चौरे मरण पावला.

दरम्यान, या घटनेनंतर चौरेचा मित्र सचिन गणपत गरड व त्याचा मित्र घटनास्थळी आला असता चौरे हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ही माहिती उपनगर पोलिसांना समजताच पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पगारे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. दरम्यान, या घटनेनंतर सचिन गरड याने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी हल्लेखोर सुलतान मुक्तार शेख, रोहित पगारे, शुभम खांडरे, अमन शेख यांना अटक केली आहे. हा हल्ला प्रेमप्रकरणावरून झाल्याचे समजते.

पोलिस आयुक्तांनी लक्ष घालण्याची मागणी

गेल्या काही महिन्यांपासून उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. एक ते दीड महिन्यापूर्वीच जेलरोड परिसरातील लोखंडे मळा येथे राहणाऱ्या एका महिलेच्या घरात घुसून हल्लेखोरांनी लूटमार करून तिची हत्या केली होती. या गुन्ह्याचा तपास अद्यापही लागलेला नाही. त्याचप्रमाणे उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सातत्याने हाणामारीचे चोरीचे प्रकार घडतात. त्यातच मोठ्या प्रमाणात उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत पोलिस आयुक्तांनीच लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहे. 

हेही वाचा :

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक appeared first on पुढारी.