नाशिक-शिर्डी प्रवास महागला, ‘हे’ आहे कारण

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर-शिर्डी महामार्गावरील (रा. म. क्र.१६०) पिंपरवाडी येथील टोलनाका तांत्रिक अडचणीमुळे तब्बल आठवडाभराच्या विलंबानंतर शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ पासून कार्यान्वित करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांवर टोलधाड पडणार आहे. नाशिक-शिर्डी प्रवासासाठी शिंदेगावासह आता पिंपरवाडी टोलनाक्यावर पैसे मोजावे लागणार असल्याने साईभक्तांचा प्रवास महागणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्ट्रीय महामार्गाकडून नाशिक-शिर्डी रस्त्याचे ४४.७४४ किलोमीटर अंतराचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. टोलवसुलीसाठी भारत सरकारच्या राजपत्रानुसार २८.३०० किलोमीटर पिंपरवाडी येथे टोल प्लाझा उभारण्यात आला असून, अटी-शर्तींची पूर्तता करणाऱ्या राजस्थानस्थित एका नामांकित कंपनीकडे टोलनाक्याचा ताबा देण्यात आला आहे. फास्टॅगद्वारेच टोलवसुली केली जाणार आहे.

दरम्यान, टोलनाक्याच्या २० किलोमीटर परिघातील नागरिकांना टोल शुल्कात सवलत दिली जाणार आहे. अव्यावसायिक स्थानिकांच्या वाहनांसाठी ३३० मासिक पासदर ठेवण्यात आले आहे. सवलतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित नागरिकांना गाडीचे नोंदणी प्रमाणपत्र पुस्तिका (आरसी बुक), आधारकार्ड आदी कागदपत्रे टोलनाक्याच्या कार्यालयात सादर करून आपली गाडी स्थानिक श्रेणीमध्ये नाेंदणी करणे बंधनकारक असल्याचे राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

असे टोल शुल्क(दर रुपयांत)

वाहनाचा प्रकार-एकेरी फेरी-२ एकेरी फेरी-मासिक पास-जिल्हा वाहन शुल्क

कार/जीप/एलएमव्ही- ७५- ११५- २,५७५- ४०

मिनीबस/एलसीव्ही- १२५- १८५-४, १५५- ६५

बस/ट्रक- २६०- ३९०- ८,७१०- १३०

३ ॲक्सल कमर्शियल- २८५- ४२५- ९,५००- १४०

एचसीएम/इएमइ- ४१०- ६१५- १३,६५५- २०५

अवजड वाहन- ५००- ७५०- १६,६२५- २५०

हेही वाचा : 

The post नाशिक-शिर्डी प्रवास महागला, 'हे' आहे कारण appeared first on पुढारी.