Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

इलेक्ट्रिक बस www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसच्या ताफ्यात दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) सहभागी होणार आहेत. सहा-सहा महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारकडून ४० कोटी अनुदान देणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे.

केंद्र सरकारने २०२४ पर्यंत देशभरातील १३२ शहरांमधील प्रदूषण पातळी २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजना सुरू केली आहे. या योजनेत नाशिकचाही समावेश करण्यात आला असून, वायू प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी महापालिकेला केंद्राकडून ४० कोटींचे अनुदानदेखील प्राप्त झाले आहे. या अनुदानातून विद्युत शवदाहिनी, यांत्रिकी झाडू खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दरम्यान एन-कॅप योजनेत हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध योजनांकरिता निधी वापरण्याची अट असून, ही अट बदलून सर्व निधी केवळ इलेक्ट्रिक बसेस चालविण्यासाठीच उपलब्ध व्हावा यादृष्टीने महापालिकेने प्रस्ताव पाठविला आहे.

त्यानुसार, येत्या दिवाळीपर्यंत महापालिकेकडून २५ इलेक्ट्रिक (Electric Bus) बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. तर उर्वरित २५ बसेस पुढच्या वर्षी खरेदी केल्या जाणार आहेत. नाशिक महानगर परिवहन महामंडळाने जुलै २०२१ पासून सिटीलिंक बससेवा सुरू केली असून, त्यात शहरात २०० सीएनजी व ५० डिझेल बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूकसेवा पुरविली जात आहे. दरम्यान, महापालिकेने पर्यावरणपूरक बससेवेकरिता ५० इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा प्रस्ताव केंद्राच्या ‘फेम २’ योजनेंतर्गत केंद्राच्या अवजड उद्योग मंत्रालयाला सादर केला होता. त्यासाठी राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू, असे बससेवा उद्घाटन कार्यक्रमात जाहीर केले होते. त्यानुसार महापालिकेने प्रति इलेक्ट्रिक बसमागे ५० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.

५० प्रवासी आसनक्षमता

या बसमध्ये (Electric Bus) ५० प्रवाशांची आसनक्षमता असणार आहे. त्यामध्ये ४० सीट, तर १० प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार आहे. ही बस एका चार्जिंगमध्ये सुमारे २०० किलोमीटर चालणार आहे. या बसच्या चार्जिंग स्टेशनची व्यवस्था महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बस कंपनीलाच करावी लागणार आहे. शिवाय त्याकरिता येणारे लाइट बिलही कंपनीलाच भरावे लागणार आहे. महापालिकेकडून केवळ बस थांब्याकरिता जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा :

The post Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस appeared first on पुढारी.