नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे…उत्पादन तूर्तास बंद!!

दिंडोरी www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या अस्टोन पेपर मिल प्रा. ली. या कंपनीच्या बॉयलर मधून निघणारा धूर आणि अती उग्र वास आदी समस्यांमुळे  कंपनीला ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने टाळे ठोकले आहे. तसेच उत्पादन देखील तूर्तास बंद करण्यात आले आहे.

मागील सात आठ महिन्यांपूर्वी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेत दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी चर्चा झाली होती. चर्चेनंतर ग्रामपंचायत कार्यालय लखमापूर यांनी दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीला नोटीस देऊन कळविले. त्यानंतर दिनांक ८ सप्टेंबर २०२२ रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या समक्ष पंचनामा केला. त्यावरही कंपनीकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे लक्षात आल्यावर तसेच कंपनीबद्दल सततच्या तक्रारीची दखल घेत गुरुवार (दि.११) रोजी सर्वांनी प्रत्यक्ष पेपर मिलवर जात तेथील परिस्थितीत सुधारणा करावी असे ग्रामपंचायत कार्यालया मार्फत कंपनीला नोटीस देण्यात आली आहे. ग्रामपंचायत कार्यालय लखमापूर येथील सरपंच संगीता देशमुख, उपसरपंच किशोर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी संजय पाटील आणि सदस्य, ग्रामस्थ यांनी कंपनीला टाळे ठोकले आहे.

येथील कंपनीत बॉयलर पेटविण्यासाठी अशरक्ष: प्लास्टिकचा वापर होत असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. त्याचप्रमाणे कंपनी मार्फत होणारे दुर्गंधीयुक्त वायूप्रदूषण बंद करावे. तसेच वातावणात पसरणारे काजळीचे प्रदूषण देखील त्वरित बंद करावे. बॉयलर पेटविण्यासाठी प्लास्टिकचा वापर पूर्णतः थांबवावा. कंपनीच्या लगत असलेल्या ज्या शेतकऱ्यांचे कारखान्यामुळे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी कंपनीने स्वतः प्रयत्न करावे. तोपर्यंत कंपनीने उत्पादन तूर्तास बंद ठेवावे. असे ग्रामपंचायत कार्यालयाने काढलेल्या नोटिसीद्वारे कळविण्यात आले आहे. गावाच्या पश्चिम दिशेला कंपनी असल्याने बॉयलरमधून निघणारे काळे गडद धुराचे लोट गावात पसरत असल्याने व आजूबाजूच्या वातावरणातही दूरवर असलेल्या शेती पिकांना वायूप्रदूषणाचा फटका बसत असल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रार करून मार्ग काढण्याचे सुचविले आहे. कंपनीतून येणाऱ्या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनावर सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी आदींच्या स्वाक्षऱ्या निवदेनावर आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : लखमापूर ऑस्टन पेपर मिल कंपनीला ग्रामपंचायतीने ठोकले टाळे...उत्पादन तूर्तास बंद!! appeared first on पुढारी.