नाशिक, दिंडाेरी, धुळे मतदारसंघांसाठी लढत; उद्या मतदान

महाराष्ट्रात प्रचाराला पूर्णविराम!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक, दिंडाेरीसह धुळे लोकसभा मतदारसंघांतील प्रचाराचा धुराळा शनिवारी (दि. १८) बसला. शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांकडून प्रचारात जोर लावण्यात आला. आता जिल्ह्यावासीयांचे लक्ष सोमवारी (दि. २०) होणाऱ्या मतदानाकडे लागले आहे. दरम्यान रविवारी (दि. 19) अधिकारी-कर्मचारी साहित्यांसह मतदान केंद्राकडे रवाना झाले.

लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी नाशिक, दिंडोरी व धुळे मतदारसंघांसाठी मतदान हाेत आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या आरोप- प्रत्यारोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. निवडणुका घोषित झाल्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला, तर कांद्याच्या प्रश्नामुळे दिंडोरीही चर्चेत आहे. या सर्व घटनाक्रमात नाशिकमध्ये महायुतीकडून कोण लढणार, यामध्ये किमान महिनाभराचा कालावधी निघून गेला. नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना युतीने त्यांच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली. त्यामुळेच अवघ्या राज्याचे लक्ष आता नाशिकच्या लढतीकडे लागले आहे.

नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत शनिवारी सायंकाळी ६ ला प्रचाराच्या तोफा थंडावल्या. तत्पूर्वी गत १५ दिवसांपासून उमेदवारांनी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे मतदारसंघ पिंजून काढला. जाहीर प्रचार आता संपुष्टात आला आहे. त्यामुळे प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे, तर दुसरीकडे प्रचाराचा धुराळा बसल्यानंतर साऱ्यांच्याच नजरा मतदानाकडे लागल्या आहेत. दोन्ही मतदारसंघांत किती टक्के मतदान होणार, यावरच ४ जूनला विजयाचे गणित ठरणार आहे.

आता नियोजनावर भर
पंधरा दिवसांच्या प्रचाराची सांगता झाल्यानंतर उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाच्या नियोजनावर भर देत आहेत. सोमवारी (दि. २०) मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बूथ लावण्यापासून ते बूथवर याद्या उपलब्ध करून देणे, मतदानासाठी मतदारांना घराबाहेर काढणे आदी बाबींबाबत बारकाईने नियोजन केले जात आहे. दरम्यानच्या काळात जाहीर प्रचार संपल्यानेमुळे रात्रीच्या मतदारांच्या छुप्या गाठीभेटींमध्ये वाढ होणार आहे.

हेही वाचा: