नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल

कुस्ती स्पर्धा

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

मखमलाबादला शेकडो वर्षांची परंपरा असलेली व मखमलाबाद तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या नागोबा देवतेची यात्रा नागपंचमीला सोमवारी (दि. २१) तवली डोंगराच्या हिरवळीवर उत्साहात भरणार आहे. यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली आहे.

यात्रेनिमित्त ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष कारभारी काकड यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेचे नियोजन करण्यात आले. यात्रेचा खर्च ग्रामविकास मंडळ गावातील मूळ ग्रामस्थांकडून सालाबादाप्रमाने वर्गणी जमा करून भागवतात. यावर्षी वर्गणी वाढवून ती २०० रुपये करण्यात आली आहे.

पूर्वी तवलीच्या टेकडीवर एक नागोबाचा चिरा होता, परंतु आज याठिकाणी एक नागोबा नागदेवी चिऱ्याचे भव्य मंदिर उभे राहिले आहे. त्याच्याच लगत मनसामाता मंदिराचीही उभारणी करण्यात आली आहे. या टेकडीचा विकास आता केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून करण्यात आला आहे. सुमारे ११ हजार विविध जातींची झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यामुळे हे ठिकाण एक निसर्गरम्य झाले आहे.

नागोबा मंदिरातील चिऱ्याला एक इतिहास असल्याने मखमलाबाद परिसरातील ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविकही आवर्जून हजेरी लावतात. यात्रोत्सव उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी अध्यक्ष कारभारी काकड उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंगळे, सचिव मिलिंद मानकर यांच्यासह ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.

मखमलाबाद येथील नागपंचमी यात्रेनिमित्त गावाजवळ कुस्त्यांची दंगल दुपारी भरणार आहे. स्पर्धेसाठी २१ हजार रुपयापर्यंत बक्षिसे आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : नागपंचमीनिमित्त मखमलाबादला आज यात्रा, विराट कुस्त्यांची दंगल appeared first on पुढारी.