राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल

शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील बेबनाव चव्हाट्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय भूकंपानंतर (NCP crisis) उत्तर महाराष्ट्रात चारही जिल्हे मिळून विधानसभेच्या ३६ पैकी तब्बल २७ जागांवर सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सत्तेच्या या सारीपाटामध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राजकीय समीकरण बदलणार असताना इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांना जागावाटप व तिकीट देतेवेळी समतोल साधावा लागणार असल्याने कस लागणार आहे. त्याचवेळी काँग्रेस, ठाकरे गट, मनसे आणि एमआयएमसाठी ही अस्तित्वाची लढाई असेल.

महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षभरानंतर राजकीय भूकंप झाला असून, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजप-शिवसेनेशी हातमिळवणी करत सत्तेत वाटेकरी झाले. ना. पवारांच्या खेळीनंतर महाराष्ट्राचे राजकारण नव्या टप्प्यावर आले असताना २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होताना दिसून येईल. राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या उत्तर महाराष्ट्रातही सत्तेचे गणित बिघडले आहे. उत्तर महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिक जिल्ह्यात १५ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे सहाही आमदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामागे उभे आहेत. तसेच भाजपचे ५, तर शिवसेना (शिंदे गट) दोेन आमदार आहेत. त्यामुळे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार सत्ताधाऱ्यांकडे १३ आमदार आहेत. काँग्रेस व एमआयएमचा प्रत्येकी एक आमदार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यात सर्व पक्षांमधून इच्छुकांची संख्या वाढली आहे. मात्र रविवारी (दि. २) झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर सेना, भाजप व राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर डोकेदुखी वाढणार आहे. नांदगावमध्ये ना. छगन भुजबळ विरुद्ध आ. सुहास कांदे, सिन्नरमध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे विरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे, निफाडमध्ये ना. भुजबळ विरुद्ध भाजप नेत्या अमृता पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर तिन्ही पक्षांमध्ये हे वाद मिटविताना नाकीनऊ येणार आहे. त्याचवेळी काँग्रेसला त्यांची इगतपुरी व एमआयएमला मालेगाव मध्यची जागा वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागेल. यासर्व घडामोेडीत कोरी पाटी असलेल्या ठाकरे गट व मनसेचे नशीब मतदारांच्या काैलवर अवलंबून असेल.

ना. पाटील यांना धक्का

जळगावमध्ये १२ आमदार आहेत. जिल्ह्याकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन असे दोन कॅबिनेटमंत्री पदे होती. रविवारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अमळनेरचे अनिल पाटील यांच्या रूपाने तिसरे कॅबिनेटपद जिल्हाला मिळाले आहे. ना. अनिल पाटील यांच्यामुळे पालकमंत्री पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का बसणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक फळीतील काही कार्यकर्ते वगळता, अन्य पदाधिकाऱ्यांनी खा. शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

धुळ्यात वेट ॲण्ड वॉच

धुळ्यात पाच आमदार असून, त्यात भाजपचे 2, तर काँग्रेस, एमआयएम व अपक्ष असे प्रत्येकी 1 आमदार आहे. शिवसेनेचे दोन्ही गट व राष्ट्रवादीचे येथे तूर्तास राजकीय बळ नाही. मात्र, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत, त्यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

नंदुरबारमध्ये तीन गट

नंदुरबारमध्ये भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी दोन विद्यमान आमदार आहेत. भाजपच्या कोट्यातून १ कॅबिनेट मंत्रिपदही जिल्ह्याकडे आहे. सध्या शिवसेना शिंदे व ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे जिल्ह्यात प्राबल्य नाही. दरम्यान, काँग्रेसचे दोन आमदार असूनही पक्षात एकजूट नाही. राष्ट्रवादीमध्ये खा. पवार, ना. अजित पवार आणि आ. एकनाथ खडसे यांना मानणारा वर्ग आहे. त्यामूळे जिल्ह्यात राष्ट्रवादी तीन टप्प्यांत विखुरली आहे.

लोकसभेत भाजपचे पारडे जड

उत्तर महाराष्ट्रात चारही जिल्हे मिळून 6 खासदार आहेत. त्यामध्ये नाशिकमध्ये शिवसेना (शिंदे गट) खासदार आहे. तर उर्वरित दिंडाेरी, नंदुबार, धुळे, जळगाव व रावेरला भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केल्यास सत्ताधाऱ्यांमध्ये भाजपचे पारडे जड आहे.

हेही वाचा : 

The post राजकीय समीकरण बदलणार, उत्तर महाराष्ट्रात साधावा लागणार समतोल appeared first on पुढारी.