नाशिक: पुढारी वृत्तसेवा
मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभानिहाय जागांच्या आढावा बैठकीमध्ये जिल्हाध्यक्षांनी दिंडोरीची जागा राष्ट्रवादीला मिळण्याबाबत आग्रही मागणी केली. लोकसभा मतदारसंघात असलेल्या विधानसभा सदस्य, बाजार समिती, ग्रामपंचायती यासारख्या माध्यमातून अजित पवार गटाची असलेल्या पकडीचे विश्लेषण केले. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपाबाबतील बैठकीवेळी हे सर्व मुद्दे मांडून जागेबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची ग्वाही दिली.
लोकसभा निवडणूकासाठीची आचारसंहिता कधीही लागण्याची शक्यता आहे. महायुतीत अद्याप कोणत्याही जागेबाबत स्पष्टता होत नाही. या निवडणुकीसाठी महायुतीमधील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नाशिक आणि दिंडोरीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडून मतदारसंघावर दावेदारी सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभानिहाय जागांच्या आढावा बैठका मुंबईत मंगळवारी (दि ५) आयोजित करण्यात आल्या होत्या. पहिलीच बैठक नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची पार पडली. या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, मुंबई राष्ट्रवादी अध्यक्ष समीर भुजबळ, मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित होते.
बैठकीत नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा करण्यात आली आहे. बैठकीमध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटल्यास त्या ठिकाणाहून लढण्यासाठी सज्ज असल्याची भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, चांदवड-देवळा, निफाड, येवला आणि नांदगाव-मनमाड या विधानसभा मतदारसंघाचा तयार होतो. यामध्ये दिंडोरी-पेठमध्ये विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ, कळवण-सुरगणामध्ये आ. नितीन पवार, निफाडमध्ये आ.दिलीप बनकर, येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ या चार मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस तर चांदवड-देवळामध्ये भाजपचे आ. राहूल आहेर आणि नांदगावमध्ये शिवसेनेचे आ. सुहास कांदे आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीसाठी सुरक्षित मतदारसंघ समजला जात असल्याच्या चर्चा झाल्या आहेत. तसेच कांदा प्रश्नावरून सध्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात नाराजी असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार निवडून येण्यास मदत होऊ शकते, असे देखील मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
आजच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष या नात्याने दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी कसा सुरक्षित आहे तसेच या ठिकाणी निवडूण येण्याची शक्यता किती प्रमाणात आहे, याचे गणित पक्षाच्या वरिष्ठांकडे मांडले आहे. जेव्हा महायुतीची जागावाटपाबाबत बैठक होईल तेव्हा नक्कीच याचा विचार केला जाईल. – रविंद्र पगार, जिल्हाध्यक्ष, नाशिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.
The post नाशिक : पक्षाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष अजित पवार यांची माहीती appeared first on पुढारी.