नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याप्रकरणी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, माईनकर यांनी धमकावत, गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची मागणी केल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

कांदे यांच्या फिर्यादीनुसार, शीला दामोदर सामंत यांच्या मालकीच्या प्लॉटची काही संशयितांनी परस्पर विक्री करून फसवणूक केली आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात 2016 मध्ये गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, त्याचा तपास गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर करीत होते. या गुन्ह्यात सुहास कांदे यांना संशयित आरोपी करून इतर संशयितांच्या माध्यमातून माईनकर यांनी पैशांची मागणी केली. या प्रकरणी कांदे यांना समजपत्र देऊन चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यामुळे कांदे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला. नंतर या फसवणुकीच्या गुन्ह्यात कांदे यांनी क्लीन चिट मिळाली आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील इतर संशयितांना कांदे यांचे नाव जबाबात घेण्यास दमदाटी करीत चार लाख रुपयांची मागणी माईनकर यांनी केल्याचे कांदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. यासंदर्भात फसवणुकीच्या गुन्ह्यातील इतर संशयित आरोपींच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत त्यासाठी दोन बैठक केल्या. या बैठकीतील संभाषणाचे रेकॉर्डिंग असल्याचेही कांदे यांनी सांगितले. दरम्यान, राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याची चर्चा रंगली आहे.

‘लाचलुचपत’कडून माईनकरांना क्लीन चिट
आ. सुहास कांदे यांनी न्यायालयात दावा दाखल करून माईनकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेही तक्रार केली होती. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून माईनकर यांना क्लीन चीट दिल्याचे समजते.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप appeared first on पुढारी.