नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन

हेल्पलाईन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला असून, पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. शेतकर्‍यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२७६६३६३ या बळीराजा हेल्पलाइनवर कॉल करताच पोलिसांची मदत मिळणार आहे. या हेल्पलाइनचा शुभारंभ सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सोमवारी (दि.१४) झाला.

अवैध व्यवसायाविरोधात कारवाई करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी यापूर्वी ६२६२२५६३६३ ही ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली होती. या हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक जागरूक नागरिकांनी आपापल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे ग्रामीण पोलीसांना अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाई करण्यात मदत झाली. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनेक कामांसाठी पोलिस ठाण्यात व इतर कार्यालयांमध्ये जावे लागते. ही बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी शेतकर्‍यांसाठी ‘बळीराजा’ हेल्पलाइन सुरू केली आहे. याप्रसंगी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे आदी उपस्थित होते.

पोलिसांचे आवाहन

शेतकर्‍यांच्या समस्या सोडवणुकीसाठी नाशिक ग्रामीण पोलिस दल कटिबद्ध असून, शेतकरी बांधवांनी त्यांच्या तक्रारी बळीराजा हेल्पलाइनचे माध्यमातून मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : बळीराजासाठी आता पोलिसांची हेल्पलाइन appeared first on पुढारी.