नाशिक : बांधकाम व्यावसायिकाने मजुरांकडून टाकला वृद्ध दाम्पत्याच्या घरी दराेडा

दरोडा pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कॉलेजरोड परिसरात १६ एप्रिलला तपस्वी बंगला येथे चार संशयितांनी वृद्ध दाम्पत्यांच्या घरात शिरून दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व महत्त्वाचे कागदपत्रे हिसकावून नेले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना पकडले आहे. संशयितांकडील तपासातून शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना सुपारी देत वृद्ध दाम्पत्यांचे घर खाली करण्यास सांगितल्याचे उघड झाले. बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना दिली सुपारी

शशिकुमार माधवराव तपस्वी (७५) यांचा कॉलेजरोडवर बंगला आहे. या बंगल्यात १६ एप्रिलला रात्रीच्या सुमारास चार ते पाच जण बळजबरी शिरले. त्यांनी तपस्वी दाम्पत्यांना शस्त्राने मारहाण करीत दमदाटी करून त्यांच्या घरातील चार लाख ७८ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दरोडेखोरांना पकडण्याचे आदेश दिले. त्यानुसार गंगापूर पोलिस व गुन्हे शाखा युनिट एकचे पथक संयुक्तरीत्या तपास करीत होते.

गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार नाझीमखान पठाण व अंमलदार आप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने गाडगे महाराज पुलाखाली सापळा रचून संशयित संदीप भारत रनबावळे (रा. जि. वाशिंद, सध्या रा. शरणपूर रोड), महादेव बाबूराव खंदारे (रा. कॉलेजरोड) यांना पकडले. त्यांच्याकडील सखोल चौकशीत त्यांनी एका अल्पवयीन मुलासह अरुण ऊर्फ बबन गायकवाड यांच्यासोबत मिळून दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून दुचाकी व चार हजार ७२० रुपये रोख असा ७४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी संशयित संदीपकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने हा दरोडा बांधकाम व्यावसायिक अजित प्रकाश पवार (रा. लक्ष्मीनगर, कॉलेजरोड) याच्या सांगण्यावरून टाकल्याचे उघड झाले. संशयित अजित पवार याने दोन महिन्यांपूर्वी संदीपला कॉलेजरोडवरील तपस्वी बंगला खाली करून देण्याच्या मोबदल्यात ८ ते १० टक्के कमिशन देण्याची सुपारी दिली. त्यासाठी संशयितांना तपस्वी दाम्पत्यांना धमकावून घर खाली करण्यास अजित पवारने सांगितले. त्यानुसार संशयितांनी दरोडा टाकला.

पोलिसांनी दरोड्यातील मोबाइल व कागदपत्र असा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या सूचनांनुसार, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, हवालदार पठाण, महेश साळुंके, रमेश कोळी, नाईक मिलिंद परदेशी, अंमलदार पानवळ, नितीन जगताप, विलास चारोस्कर, अमोल कोष्टी व जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

भूमाफियांची जीवघेणी भूक
कॉलेजरोड परिसरात तपस्वी दाम्पत्यांचा बंगला असून, तो ‘प्राइम लोकेशन’ वर असल्याने बांधकाम व्यावसायिक अजित पवारची त्यावर नजर होती. त्यामुळे त्याने बांधकाम मजुरांना सुपारी देत दरोडा टाकून दाम्पत्यांना धमकावण्यास सांगितले. पवार याने काही महिन्यांपूर्वी एका प्रॉपर्टी एजंटलासुद्धा तपस्वी यांच्याकडे पाठवून बंगल्याचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तपस्वी दाम्पत्याने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला नव्हता. या आधीही जमिनीच्या वादातून बांधकाम व्यावसायिक व भूमाफियांचा जमिनीसाठी जमीन मालकांचा खून करणे, त्यांना धमकावणे या गुन्ह्यांत सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे भूमाफियांमुळे जागामालक त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

संशयितांना पोलिस कोठडी
गंगापूर रोड परिसरातील पाइपलाइन रोड परिसरात दोन ते तीन गृह व व्यावसायिक प्रकल्प संशयित अजित पवार उभारत आहे. पोलिसांनी त्यास अटक केली असून, पवार व इतर दोघांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि. ३०) पोलिस कोठडी सुनावली आहे. तर अल्पवयीन संशयितास बाल न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर अरुण ऊर्फ बबन गायकवाड, नंदकिशोर रणबावळे या संशयितांचा शोध सुरू आहे.

असे पकडले संशयितांना
गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी बंगल्याच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र त्यात काही आढळले नव्हते. परिसरातील एका सीसीटीव्हीत एक संशयित पायी पळताना दिसला. त्याचे विश्लेषण केले असता (एमएच १८, ई ६०८९) क्रमांकाच्या दुचाकीवरून रात्री तिघे घटनास्थळी आले होते. मात्र गुन्हा केल्यानंतर ते पायी पळाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी (दि. १७) सकाळी संशयिताने परिसरातून दुचाकी नेली. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यांवरील सीसीटीव्हींच्या आधारे तपास करीत कुलकर्णी गार्डन परिसरातील निर्माणाधीन इमारतीपर्यंत माग काढला. सीसीटीव्हीतील संशयित बांधकाम इमारतीत वॉचमन होता. त्यानुसार पोलिसांनी संशयितांची धरपकड केली.