नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे…बदलत्या शेतीचा फटका

pakshi www.pudhari.news

नाशिक (कवडदरा)  : पुढारी वृत्तसेवा

शेती म्हणजे नुसतीच रानातली पिके नाहीत, तर शेतीत बांधावरची झाडीसुद्धा असतात. हे ज्याला समजले, त्याची शेती फायद्याची झाली. बदलत्या शेतीत मात्र हे सूत्र बदलले असून, बांधावरच्या झाडांवरच पहिली कुर्‍हाड पडत आहे. त्यामुळे शेतीचे तर नुकसान होतच आहे, पण त्या झाडांवर आश्रयास असलेल्या पक्ष्यांचेही स्थलांतर होत आहे. त्यामुळे निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक देशोधडीला लागत आहे.

शेताचे बांध चिंच, बकान, बाभूळ, बिजा, बोर, वड, शिरस, शिसू, सुबाभूळ, पिंपळ, एरंड, चिल्लार, मेंदी, विलायती बाभूळ, करंज, पळस, सीताफळ यासारख्या झाडांनी भरलेले असायचे. आता यातली बाभूळ तर बघायलाही मिळत नाही. रानात काटे कशाला आणि बाभळीचे करायचे काय असे म्हणून बाभळी तोडल्या गेल्या. आता रानात कुठेतरी एखादी चुकून राहिलेली बाभूळ दिसते. बाभळीच्या झाडांचे उंबरे प्रत्येक घराला वापरले जात होते. आता घराला उंबरठेच राहिले नाहीत, तर बाभूळ काय कामाची? जळणासाठी ती तोडली गेली आणि बांधावरच्या बाभळीची संख्या झपाट्याने कमी होत गेली. एकतर बाभळी आणि बोरीला मुद्दाम लावावे लागत नाही. ही काटेरी झाडे कुठेही माळरानावर येतात. पाणी पाजायचा, राखत बसायचा प्रश्न नाही. लिंब, करंज, पळसही असेच. विनाखर्चाचे. बांधावरची ही काटेरी झाडे गेली आणि त्याचा सगळ्यात मोठा परिणाम पक्ष्यांवर झाला. कोल्हा, ससा, खोकड यासारख्या प्राण्यांचे वसतिस्थान काटेरी झुडपांजवळच असते. पक्षी, सुगरण आपले घरटे बोरी, बाभळीसारख्या काटेरी झाडावरच बांधतात. कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या यांची घरटीही बाभळीवरच दिसतात. खारुटीचे घरटे बाभळीच्या झाडावरच असते. शेतीच्या बांधावरची स्थानिक जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. झाडाच्या सावलीत पिके वाढत नाहीत या समजुतीनेही ती तोडण्यात आली आणि त्याचा फटका शेतीबरोबरच पयार्वरणालाही बसला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : बांधावरची संपली झाडे; पक्षी उडाले रानाकडे...बदलत्या शेतीचा फटका appeared first on पुढारी.