सिडको, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – महापालिकेकडून अंबड भागातील फडोळ मळा परिसरात ड्रेनेज पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना गॅस कंपनीची पाइपलाइन फुटल्याचा प्रकार घडला. पाइपलाइन फुटून गॅस बाहेर येऊ लागल्याने परिसरातील नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. दरम्यान, १५ ते २० मिनिटांनंतर पाइपलाइनचा मुख्य व्हाॅल्व्ह बंद केल्याने मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
शहर परिसरात भूमिगत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होत आले असून, काही भागांत किरकोळ स्वरूपात पाइप टाकण्याचे काम सुरू आहे. फडोळ मळा परिसरात ड्रेनेज विभागाच्या ठेकेदाराकडून ड्रेनेज पाइप टाकण्यासाठी खोदकाम सुरू असताना एका गॅस कंपनीची पाइपलाइन फुटल्याने गॅस प्रेशरचा मोठा आवाज झाल्याने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर अंबड पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच गॅस पाइपलाइन कंपनीचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांनी एखादी दुर्घटना होते की काय तसेच गॅस प्रेशरचा मोठा आवाज येऊ लागल्याने स्वतःच्या घरातून नागरिक बाहेर पडताना दिसून आले.
विशेष म्हणजे नियमबाह्य पद्धतीने खोदकाम सुरू असल्याने ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. बांधकाम विभागाकडून पावसाळा सुरू होणार असल्याने पूर्णतः खोदकामाला परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कृपाशीर्वादाने ठेकेदाराने मनमानी पद्धतीने खोदकाम केले अन् गॅस पाइपलाइन फुटल्याचा प्रकार घडला. त्यामुळे मनपा आयुक्त संबंधित ठेकेदारावर तसेच ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
ऐन पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या आशीर्वादाने ठेकेदाराने खोदकाम केले. यात ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी. बांधकाम विभागाकडून खोदकामाची परवानगी घेतली आहे की नाही? अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. ठेकेदाराकडून विनापरवानगी नियमबाह्य खोदकाम सुरू असेल तर त्याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
हेही वाचा: