नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी अंबड वेअर हाउस येथील स्ट्राँगरूम येथे होणार आहे. त्या ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून शहर वाहतूक पोलिसांनी अंबड वेअर हाउसकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल केला आहे. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. ४) पहाटे 4 पासून रात्री 10 पर्यंत परिसरातील रस्त्यांवर निर्बंध असणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी, त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या ज्या वाहनांना परवानगी आहे, त्यांना हे निर्बंध लागू नसतील. पोलिस सेवेतील, अग्निशमन दलाची वाहने यांनाही नियमांतून सूट असेल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रवेश बंद मार्ग…
- जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेड ते अंबड वेअर हाउसपर्यंत
- अंबड वेअर हाउसपासून पॉवर हाउस
- ग्लॅक्सो कंपनी ते संजीवनी बोटॅनिकल नर्सरीकडे अवजड वाहतुकीला प्रवेश बंद
- अंबड गावाकडून दोंदे मळ्याकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद
पर्यायी मार्ग…
- जेमिनी इंस्ट्राटेक लिमिटेडकडून गरवारेमार्गे इतरत्र
- गरवारेकडून एक्स्लो पॉइंटमार्गे इतरत्र
- अंबड गावाकडून अजिंठा हॉटेलमार्गे एक्स्लो पॉइंटकडून इतरत्र
उमेदवार-कार्यकर्त्यांसाठी वाहनतळे…
- महायुती : चुंचाळे पोलिस चौकीशेजारील जागा : पाथर्डी फाटा-गरवारेमार्गे चुंचाळे चौकी
- महाविकास आघाडी : अंबड पॉवर हाउससमोरील जागा : पाथर्डी फाटा-सिडको हॉस्पिटलमार्गे अंबड गावातून पॉवर हाउस
- इतर व अपक्ष : फिनोटेक्स कंपनी, नेक्सा शोरूमसमोर : पाथर्डी फाटा-सिडको हॉस्पिटल-फ्रेशअप बेकरीमार्गे
अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे. – चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, वाहतूक
हेही वाचा:
- Lok Sabha Exit Poll 2024 | उत्कंठा मतमोजणीची : प्रशासन सज्ज; उद्या दुपारी तीनपर्यंत पहिला निकाल हाती येणार
- एक्झिट पोलमध्ये पुण्यात मोहोळ आघाडीवर; धाकधूक वाढली