नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत

नाशिक महानगरपालिका pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पाच पैकी चार उपायुक्तांची एकाचवेळी बदली झाल्यानंतर मुख्याधिकारी गट-अ संवर्गातील अजित निकत नाशिक महापालिकेला उपायुक्त म्हणून लाभले आहेत. यासंदर्भातील आदेश शासनाच्या नगरविकास विभागाकडून जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेत अद्यापही उपायुक्तांची आता तीन पदं रिक्त असून या पदांवर शासन प्रतिनियुक्तीच्या आदेशांची प्रतिक्षा आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, कर उपायुक्त श्रीकांत पवार, समाजकल्याण उपायुक्त प्रशांत पाटील व पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या बदलीचे आदेश गेल्या आठवड्यात महापालिकेत धडकले होते. उपायुक्त प्रशांत पाटील यांची मूळ जीएसटी विभागात बदली करण्यात आली होती. तर उर्वरित तिघा उपायुक्तांच्या पदस्थापनेचे आदेश प्राप्त झालेले नव्हते. मंगळवारी रात्री उशिरा राज्याच्या नगरविकास विभागाकडून महाराष्ट्रातील शहरी प्रशासकीय सेवेतील ३७ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेचे तसेच महापालिकांमधील नऊ अतिरीक्त आयुक्त व उपायुक्त पदावरील प्रतिनियुक्तीचे आदेश जारी करण्यात आले. नाशिक महापालिकेतून बदली करण्यात आलेल्या लक्ष्मीकांत साताळकर यांची तसेच श्रीकांत पवार यांची अहमदनगर महापालिकेच्या उपायुक्तपदी पदस्थापना करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अजित निकत यांची नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदावर प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. निकत यांना कुठला विभाग दिला जाणार हे आदेशात नमूद करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी गट अ संवर्गातील श्रीनिवास कुरे यांची विभागीय महसुल आयुक्तालयात सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बदली झालेल्या ठिकाणी तत्काळ रूजू होण्याचे आदेश नगरविकास विभागाचे अवर सचिव अ. का. लक्कर यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले आहेत. दरम्यान, महापालिकेला शासन प्रतिनियुक्तीवर एक उपायुक्त लाभला असला तरी अद्यापही उपायुक्तपदाची तीन पदं रिक्त आहेत. या पदांवरील प्रतिनियुक्तीच्या आदेशांची महापालिकेला प्रतिक्षा आहे.

The post नाशिक महापालिकेच्या उपायुक्तपदी अजित निकत appeared first on पुढारी.