नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार

नाशिक मुंबई महामार्ग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-खडड्यांमुळे होणारी वाहतुक कोंडीची समस्या कायमची निकाली काढण्यासाठी नाशिक-मुंबई महामार्गाच्या रुंदीकरणाबरोबरच काँक्रीटीकरणही केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक महापालिका हद्दीलगतच्या २० किलोमीटर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची निविदा देखील प्रसिध्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पार पडलेल्या बैठकीत देण्यात आल्याचे नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी सांगितले.

गेल्या पावसाळ्यात खड्डेमय बनलेल्या नाशिक-मुंबई महामार्गामुळे नाशिक-मुंबईचा प्रवास खडतर बनला. खड्ड्यांमुळे होणारी वाहतुक कोंडी नित्याची बनली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई या १८० किलोमीटर लांबीच्या तीन तासांच्या प्रवासाकरीता आठ तास लागत असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या महामार्गाची खड्ड्यातून मुक्ती होण्यासाठी काँक्रीटीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी आमदार फरांदे यांच्यासह आमदार माणिकराव कोकाटे, आमदार रशीद शेख, मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, आमदार फरांदे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार शेख रशीद तसेच राष्ट्रीय महामार्गाचे मिलिंद पाटील, श्रीवास्तव, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे संजय दशपुते आदी अधिकारी उपस्थित होते. आ. फरांदे यांनी या बैठकीत या महामार्गावरील वाहतुक कोंडी, खड्ड्यांमुळे नाशिक येथून मुंबईकडे जाण्यासाठी सहा ते सात तासाचा कालावधी लागत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. गोंदे ते पिंपळगाव हा रस्ता सहा पदरी असून गोंदे ते वडपे हा रस्ता मात्र चार पदरी असल्यामुळे सदर ठिकाणी बॉटल नेक तयार होतो. त्यामुळे वाहतूक खोळांबा होऊन राष्ट्रीय संपत्तीचे

देखील नुकसान होते. त्यामुळे गोंदे ते वडपे हा रस्ता देखील सहा पदरी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच पावसाळ्यात होत असणारी दुरावस्था लक्षात घेऊन हा संपूर्ण रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याची मागणी केली. नाशिकचे पालकमंत्री भुसे यांनी लक्ष दिल्यानंतर रस्त्याच्या कामांना वेग आला असून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पुर्ण होणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे-वडपे काम चार महिन्यात पुर्ण होणार

मंत्री दादा भुसे यांनी नाशिक-मुंबई रस्त्यावरील ठाणे ते वडपे हा भाग एमएसआरडीसी कडे असून या रस्त्याचे काम वेगाने सुरू आहे. ज्या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होते अशा ठिकाणी अंडरपास व उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू असून उर्वरित रस्ता आठ पदरी केला जात आहे. सदर काम चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

पिंपळगाव-वडपे रस्त्याचे नुतनीकरण

राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीवास्तव यांनी नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रिटीकरण करण्याचा प्रस्ताव असून, नाशिक महानगरपालिका क्षेत्रालगत वीस किलोमीटर रस्त्याचे विस्तारीकरण व काँक्रिटीकरणासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. पिंपळगाव ते वडपे रस्ता टोलची मुदत आणखी दोन वर्षे बाकी असून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे आहे. त्यांच्याकडून लवकरच या रस्त्याचे नूतनीकरण करून घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

हेही वाचा :

The post नाशिक-मुंबई महामार्गाचे काँक्रीटीकरण होणार appeared first on पुढारी.