नाशिक शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त 

drugs

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकरोड पोलिसांनी पंचक गावाजवळ कारवाई करीत एकाकडून ३२ ग्रॅम एमडी साठा जप्त केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी संशयित सागर शिंदे (३०, रा. पिंपळ पट्टी रोड, जेलरोड) यास पकडले आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी एमडी तयार करणारा कारखाना, गोदामावर कारवाई करीत कोट्यवधी रुपयांचा एमडी साठा जप्त केला आहे. त्यानंतरही पोलिसांनी सतत कारवाई करीत एमडी विक्री करणाऱ्यांची धरपकड केली आहे. मात्र तरीदेखील शहरात एमडी विक्री सुरुच असल्याचे चित्र आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची गस्त सुरू असताना पिंपळपट्टी रोड परिसरात एकजण एमडी विक्रीच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांना कळविले. पथकाने परिसरात सापळा रचून संशयित सागर यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ लाख ६ हजार ५५० रुपयांचे एमडी जप्त करण्यात आले. त्याने जाफर पटेल (रा. कथडा, जुने नाशिक) व सैफुला भाई (रा. अशोका रोड) या संशयितांकडून एमडी घेतल्याची कबुली पोलिसांना दिली. नाशिकरोड पोलिसांनी सागरसह जाफर व सैफुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जाफर व सैफुला यांचा शोध सुरु आहे.

संशयिताविरोधात यापूर्वी शरीराविरुद्धचे गुन्हे आहेत. त्याला पिंपळपट्टी रोड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या इतर दोन साथीदारांचा शोध सुरू आहे. संशयितांनी एमडी कोठून आणला यासंदर्भात तपास सुरू आहे. – प्रवीण सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, नाशिकरोड पोलिस ठाणे

हेही वाचा :

The post नाशिक शहरात ड्रग्ज विक्री सुरुच, एकाकडून ३२ ग्रॅम साठा जप्त  appeared first on पुढारी.