निवडणूकीचा बिगुल: १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर तर २० मे नाशिक, दिंडोरी, धुळेला मतदान

Election 2024 pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
१८ व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर या तीन मतदारासंघासाठी चौथ्या टप्प्यात १३ मे, तर नाशिक, दिंडोरी व धुळे या तीन मतदारसंघाकरीता पाचव्या व अंतिम टप्प्यांत २० मे रोजी मतदान हाेणार आहे. देशभरात एकाच वेळी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. या निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील ५ टप्पे
१) १९ एप्रिलला गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक या ५ मतदारसंघांसाठी निवडणूक होईल.
२) २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ मतदारसंघांसाठी निवडणूक होईल.
३) ७ मे रोजी कोलापूर, हातकणंगले, सातारा, सांगली, रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या ११ जागांसाठी निवडणूक होईल.
४) १३ मे रोजी पुर्ण, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या ११ जागांसाठी निवडणूक होईल.
५) २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघासाठी निवडणूक होईल.

हे देखील महत्वाचे…
• १ एप्रिलपर्यंतची मतदारयादी अद्ययावत.
• मतदाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांत दखल घेणार.
• उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास तसे नमूद करावे लागेल.
• एकूण १.५ कोटी कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतील.
• लोकसभा निवडणुकीत अफवा रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष.
• सर्व विमानतळांवर तपासणी होणार. सर्व चार्टर्ड विमानांचीही तपासणी होणार
• हेलिकॉप्टर लैंड झाल्यानंतर तपासणी होईल.
• राजकीय पक्षांनी सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याचा निवडणूक आयोगाचा सल्ला.
• निवडणूक यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचणार.
• बँकांना पैशाचे ताळेबंद द्यावे लागतील.
• खोट्या बातम्यांविरुद्ध तातडीने कारवाई होणार, याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन.
• जात, धर्माच्या आधारावर प्रचार होणार नाही.
• राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या बनवून ठेवाव्यात.

आकडे सुध्दा बोलतात….
• २ वर्षांपासून सुरू होती निवडणुकीची तयारी
• ५५ लाख ईव्हीएमचा निवडणुकीत वापर होणार
• ९६.६ कोटी एकूण मतदार
• ४९.७ कोटी पुरुष, तर ५७.१ कोटी महिला मतदार
• बारा राज्यांत पुरुषांपेक्षा महिला मतदारच अधिक
• १.८२ कोटी नवमतदार करणार मतदान
• १८-१९ वयोगटातील महिला मतदारांची संख्या ८५ लाख तर २०-२९ वयोगटातील मतदारांची संख्या १९.७४ कोटी
• ८५ वर्षावरील ज्येष्ठांसह दिव्यांगांनाही घरबसल्या मतदान करता येणार
• ८२ लाख मतदारांचे वय ८५ पेक्षा अधिक
• २१.५ कोटी युवा मतदार करणार मतदान
• १०.५० लाख एकूण मतदान केंद्रे

सहा जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान
महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार संघर्ष बघायला मिळत आहे. लोकसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील वाद आता निवळल्याचे दिसत असून, महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा मात्र अद्याप सुटू शकलेला नाही. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि कुरघोडपांचे राजकारण सुरू असताना शनिवारी (दि.१६) केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा करत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. देशभरात सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, महाराष्ट्रातही लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी, तर शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे २० मे रोजी होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील सहा जागांसाठी चौथ्या व पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, मावळयात १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपणार आहे. तत्पूर्वी देशात या निवडणुकांद्वारे नवीन सरकार स्थापन होईल.

The post  निवडणूकीचा बिगुल: १३ मे रोजी नंदुरबार, जळगाव, रावेर तर २० मे नाशिक, दिंडोरी, धुळेला मतदान appeared first on पुढारी.